पिंपरी चिंचवड शहराचे हित होते तर इंदौर दौरा छुप्या पद्धतीने का केला? शिवसेनेचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 21:38 IST2021-07-06T21:38:06+5:302021-07-06T21:38:32+5:30
दौऱ्यामागे कोट्यवधी रुपयांचे डस्टबिन वाटण्याचे षडयंत्र : शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची टीका

पिंपरी चिंचवड शहराचे हित होते तर इंदौर दौरा छुप्या पद्धतीने का केला? शिवसेनेचा सवाल
पिंपरी : महापालिकेत सत्तेत आल्यापासून आणि आता जायची वेळ झाली तर, भाजप कचऱ्यामध्येच गुरफटली आहे. भाजपने साडेचार वर्षात कचऱ्याची केलेली व्यवस्था फेल गेली आहे. आता पुन्हा इंदौरचा कचरा पाहणी दौरा केला का?, साडेचार वर्षातील अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी भाजपची तडफड अन् दौरे सुरु आहे. दौऱ्यामागे कोट्यवधी रुपयांचे डस्टबिन वाटण्याचे षडयंत्र असल्याचे दिसून येत आहे. शहराचे हित होते. तर, दौरा छुप्या पद्धतीने का केला, अशी टीका शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली.
पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपचे दोन पदाधिकारी, स्थायीचे सहा सदस्य, विरोधी पक्षनेते आणि महापालिका अधिकाऱ्यांनी नुकताच मध्यप्रदेशातील इंदौर दौरा केला. त्यात विरोधी पक्षनेता वगळता कोणीही गटनेते उपस्थित नव्हते. त्यांना निमंत्रणही दिले नव्हते.
शिवसेना गटनेते राहुल कलाटे म्हणाले, ‘‘शहराच्या हितासाठी दौरा होता तर छुप्या पद्धतीने का केला. शिवसेना, मनसे, अपक्षांच्या गटनेत्यांना दौऱ्याबाबत का विचारणा केली नाही. विरोधी पक्षनेत्याला सोबत घेतले म्हणून कोण बोलणार नाही असे सत्ताधाऱ्यांनी समजू नये. शहरातील प्रत्येक करदात्या नागरिकांच्या प्रश्नाला सत्ताधारी बांधील आहेत.
........................
कचरा प्रश्न सोडविण्यात अपयश
कलाटे म्हणाले, ''महापालिकेतील सत्ताधारी भाजपला साडेचार वर्षात पिंपरी-चिंचवड शहरातील कचऱ्याचा प्रश्न व्यवस्थितपणे सोडविता आला नाही. सत्ताधारी भाजपने साडेचार वर्ष काहीच केले नाही. आता जाण्याची वेळ आल्यानंतर त्यांची तडफड सुरु आहे. दिवा विझताना जसा तडफडतो. तशी भाजपचे तडफड सुरू आहे. सत्तेत येताच भाजपने आठ वर्षांसाठी शहरातील कचऱ्याचे काम दोन ठेकेदारांना दिले. आता पुन्हा कचऱ्याचे दौरे सुरु आहेत.’’
............
नागरिकांवर भुर्दंड लादू नका...
कलाटे म्हणाले, ‘‘शहर स्वच्छ होणार असेल. सत्ताधाऱ्यांची तशी मानसिकता असेल. तर, चांगले आहे. त्याला आमचा विरोध नाही. पण, पूर्वीही असाच दौरा केला आणि कोट्यवधी रुपयांची निविदा काढली. त्यामुळे आत्ताच्या दौऱ्याचे फलित म्हणून शहरातील नागरिकांवर कोणताही भुर्दंड लादता कामा नये. ’’