विनापरवानगी गैरहजर राहिले; पिंपरीत महापालिका निवडणूक प्रशिक्षणाला हजारहून अधिक शिक्षकाची दांडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 17:50 IST2025-12-24T17:48:42+5:302025-12-24T17:50:22+5:30
शिक्षकांनी प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना विनापरवाना गैरहजर राहिले, निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला, याबाबत महापालिकेकडून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे

विनापरवानगी गैरहजर राहिले; पिंपरीत महापालिका निवडणूक प्रशिक्षणाला हजारहून अधिक शिक्षकाची दांडी
पिंपरी : महापालिका निवडणुकीचे कामकाज हाताळण्याच्या प्रशिक्षणाला तब्बल १ हजार ३२९ शिक्षकांनी दांडी मारली. या प्रशिक्षणास उपस्थित राहणे बंधनकारक असताना विनापरवाना गैरहजर राहिले. निवडणुकीसारख्या राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे २४६ शाळा, कॉलेजमधील १ हजार ३२९ शिक्षकांना नोटीस बजावली आहे, तसेच नोटीस मिळताच, २४ तासांत खुलासा करण्याचा इशारा आयुक्त तथा निवडणूक प्रमुख श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर सोपविली आहे. या निवडणूक कामकाजासाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध करण्यात येत आहे. त्यानुसार, विविध ठिकाणच्या कर्मचारी वर्ग एकत्रित करत १४ हजार मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत आहे.
महापालिका सार्वत्रिक निवडणूक कामकाजाच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण घेण्यात येत आहे. त्या प्रशिक्षणास संबंधित कर्मचारी, शिक्षक आणि नियुक्ती केलेल्यांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे, परंतु प्रशिक्षणास विनापरवाना गैरहजर राहून राष्ट्रीय कामकाजात अडथळा निर्माण करुन भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियमन १९५१ चे कलम १३४ मधील तरतुदीचा भंग केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास येत आहे.
दरम्यान, नोटीस बजाविलेल्या १ हजार ३२९ शिक्षकांच्या गैरवर्तनावरून तुमची राष्ट्रीय कामकाजाप्रती असलेली अनास्था, बेफिकीर वृत्ती निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करणारे आहे, तसेच सदरील नोटीस प्राप्त होताच, २४ तासांत माझ्याकडे खुलासा द्यावा. आपला खुलासा असमाधानकारक असल्यास निवडणूक कामात गैरहजर राहिला, म्हणून नोटिसीत नमूद केल्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे, असेही आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे.