बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: May 6, 2024 11:14 AM2024-05-06T11:14:52+5:302024-05-06T11:15:25+5:30

नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर करावा

shrirang barane sanjog waghere Joshi issued notice by election officials Variance found in cost audit | बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत

बारणे, वाघेरे, जोशी यांना निवडणूक अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस; खर्च तपासणीत आढळली तफावत

पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणूकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाची पहिली तपासणी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.६) झाली. 

निवडणूकीतील दैनंदिन खर्च तपासणीत माधवी नरेश जोशी, संजोग भिकू वाघेरे पाटील आणि श्रीरंग आप्पा चंदू बारणे या तीन उमेदवारांच्या खर्चात तफावत आढळून आली. त्याबद्दल त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी नोटीस दिली आहे. 

या नोटीसमध्ये नमूद केले आहे की, ३३-मावळ लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक, २०२४ च्या अनुषंगाने उमेदवाराने किंवा त्यांच्या प्राधिकृत प्रतिनिधीने निश्चित केलेल्या दिवशी निवडणुक खर्चाची नोंदवही व प्रमाणके तपासणीसाठी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार आपले प्राधिकृत प्रतिनिधी मार्फत उमेदवाराचा खर्च निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे तपासणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेला होता. या खर्चाची तपासणी केली असता निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने नोंदविलेल्या शॅडो रजिस्टरसोबत तुलना करता खरा व योग्य वाटत नाही, अथवा खर्चाचा काही भाग समाविष्ठ करण्यात आलेला नाही असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. तसेच निदर्शनास आलेली तफावत़ीची रक्कम देखील नोटीसमध्ये नमूद केली गेली आहे. 

अमान्य तफावतीबाबत सदरची नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत आपला खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीच्या वेळी सदर निवडणूक खर्चाचे लेखे ३३ मावळ लोकसभा मतदारसंघ, निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील निवडणूक खर्च नियंत्रण कक्ष येथे न चुकता सादर करावेत. विहीत मुदतीत आपले म्हणणे प्राप्त न झाल्यास नोटीसमधील नमुद खर्च आपणांस मान्य आहे असे गृहीत धरुन आपल्या निवडणुक खर्चामध्ये समाविष्ट करण्यात येईल. नोटीसमध्ये नमुद तफावत आपल्याला मान्य असल्यास सदर खर्चाचा समावेश आपल्या खर्च नोंदवहीत करण्यात यावा व तसे सूचित करण्यात यावे, असे देखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

सहा जणांनी खर्चच दिला नाही...

निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखी तपासणीकरीता उपलब्ध करून न दिल्याबाबत मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीतील ६ उमेदवारांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शिवाजी किसन जाधव, सुहास मनोहर राणे, इन्द्रजीत धर्मराज गोंड, इकबाल इब्राहिम नावडेकर, लक्ष्मण सदाशिव अढाळगे, अजय हनुमंत लोंढे या उमेदवारांनी निवडणूकीतील दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरीता उपलब्ध करून दिले नसल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस प्राप्त झाल्यापासून ४८ तासांच्या आत उमेदवाराने खुलासा सादर करावा व पुढील दुसऱ्या तपासणीवेळी सदर निवडणुक खर्चाचे लेखे सादर न केल्यास वाहने, सभा इत्यादीसाठी देण्यात आलेल्या सर्व परवानग्या तत्काळ रद्द करण्यात येतील याची नोंद घेण्यात यावी, असेदेखील नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

Web Title: shrirang barane sanjog waghere Joshi issued notice by election officials Variance found in cost audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.