भोसरी विधानसभा मतदारसंघ ठरवणार शिरूरचा खासदार; सोसायटीतील मतदारांची कोणाला साथ?
By प्रकाश गायकर | Published: May 16, 2024 03:03 PM2024-05-16T15:03:26+5:302024-05-16T15:04:47+5:30
भोसरीत पाच वर्षांत वाढलेला सोसायट्यांमधील मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे....
पिंपरी :शिरूर लोकसभेमध्ये गतवेळी जातीच्या आधारावर निवडणूक लढली गेली. त्यावेळी भोसरी विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव-पाटील यांना आघाडी मिळाली होती. याचाच अर्थ शहरी भागातील मतदार भाजप-शिवसेना युतीच्या बाजूने उभा होता. यंदाही तीच परिस्थिती राहते की बदललेल्या राजकारणाचा परिणाम होतो, यावर शिरूरचा खासदार कोण? हे ठरणार आहे. भोसरीत पाच वर्षांत वाढलेला सोसायट्यांमधील मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिरूर लोकसभेमध्ये २०१९ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे विजयी झाले होते. त्यावेळी खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर व हडपसर या पाच विधानसभा मतदारसंघांत त्यांना आघाडी मिळाली होती. मात्र, भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये कोल्हे ३७ हजार ७७ मतांनी पिछाडीवर होते. पाच मतदारसंघांतील मताधिक्यावर डॉ. कोल्हे यांनी आढळराव-पाटील यांचा पराभव केला होता. मात्र, पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राज्याच्या राजकारणात झालेल्या बदलांच्या वादळातही शिरूरची निवडणूक जुन्या प्रतिस्पर्ध्यांतच झाली.
शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने भाजप, मुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्या महायुतीची ताकद जास्त असल्याचे कागदावर दिसत होते. भोसरीतही भाजपचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी एकत्र येत ताकद पणाला लावली, तर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे मावळच्या निवडणुकीत गुंतून राहिले. प्रथमदर्शनी महायुतीची ताकद जास्त वाटत होती. असे असले तरी गेल्या पाच वर्षांत दिघी, चऱ्होली, चिखली, डुडुळगाव, मोशी या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर सोसायट्या वाढल्या आहेत. मतदार दुप्पट झाले आहेत. २०१९ मध्ये महायुतीच्या बाजूने उभा राहिलेला हा मतदार यंदा कोणाच्या बाजूने उभा राहतो, त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे.
माजी नगरसेवकांचा प्रचारात हात आखडता
भोसरीत भाजपची ताकद जास्त आहे. कारण विद्यमान आमदार भाजपचे असून पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांची संख्याही भाजपकडे अधिक आहे. मात्र, या नगरसेवकांनी प्रचारात हात आखडता घेतल्याची चर्चा आहे. यावेळी घड्याळाचा प्रचार केला तर आगामी महापालिका निवडणुकीत कोणत्या तोंडाने ‘कमळ’ चिन्हावर मते मागायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता.