PCMC Election 2026: चारही गटांत जोरदार चुरस; अण्णा बनसोडेंची प्रतिष्ठा पणाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 22:20 IST2026-01-03T22:15:26+5:302026-01-03T22:20:01+5:30
PCMC Election 2026: नेहरूनगरला दोन्ही राष्ट्रवादींत मैत्रीपूर्ण लढत, भाजपनेही रंग भरले

PCMC Election 2026: चारही गटांत जोरदार चुरस; अण्णा बनसोडेंची प्रतिष्ठा पणाला
वार्तापत्र : प्रभाग ९
मुख्य परिसर : नेहरूनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा
- जमीर सय्यद
नेहरूनगर : विधानसभेचे उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांचे पुत्र सिद्धार्थ बनसोडे यांच्या ‘एन्ट्री’ने या प्रभागाची चर्चा शहरात सुरू आहे. नेहरूनगर, उद्यमनगर, मासुळकर कॉलनी, अजमेरा, खराळवाडी व गांधीनगर या कामगारबहुल भागाचा समावेश असलेल्या प्रभागातील चारही गटांत चुरशीच्या लढती रंगणार आहेत. शहरात राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एकत्र लढत असले, तरी या प्रभागात दोन्ही राष्ट्रवादींमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत आहे.
अनुसूचित जाती (अ गट) वर्गातून राष्ट्रवादी (अजित पवार)चे सिद्धार्थ बनसोडे महापालिकेत ‘एन्ट्री’ करण्यासाठी उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या कमलेश वाळके यांनी दंड थोपटले आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून धम्मराज साळवे आणि वंचित बहुजन आघाडीकडून अशोक बनसोडे हेही मैदानात आहेत.
ओबीसी महिला ‘ब’ गटात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे यांच्यासमोर भाजपच्या तरुण उमेदवार मिनाज फारूक इनामदार आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या आस्मा इम्रान शेख यांचे आव्हान आहे. डॉ. घोडेकर यांनी यापूर्वी २००७ आणि २०१७ मध्ये बाजी मारली होती.
सर्वसाधारण महिला ‘क’ गटात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या सारिका विशाल मासुळकर यांची लढत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शीतल समीर मासुळकर यांच्याशी आहे. सख्ख्या चुलत जाऊबाईंच्या या सामन्याने लक्ष वेधले आहे.
सर्वसाधारण ‘ड’ गटात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले ‘हॅटट्रिक’ करण्यासाठी तिसऱ्यांदा उभे आहेत. ऐनवेळी काँग्रेसला रामराम करून भाजपप्रवेश केलेल्या माजी नगरसेवक सद्गुरु कदम यांनी त्यांना आव्हान दिले आहे. ॲड. महेश मासुळकर राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून उतरले आहेत.
शिंदेसेना, वंचित बहुजन आघाडी, काँग्रेसनेही उमेदवार दिले आहेत.
-------------
शहर पातळीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असले, तरी या प्रभागात त्यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. त्यामुळे नेहरूनगरमधील निवडणूक चुरशीची व लक्षवेधी ठरणार आहे.
-------------
२०१७ मधील विजयी उमेदवार
राहुल भोसले (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
समीर मासुळकर (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
डॉ. वैशाली घोडेकर (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
गीता मंचरकर (राष्ट्रवादी काॅंग्रेस)
---
महत्त्वाचे मुद्दे
गांधीनगर येथील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न.
अंतर्गत रस्त्यांचे रूंदीकरण.