PCMC Election 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संदीप वाघेरे ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 19:35 IST2026-01-03T19:30:09+5:302026-01-03T19:35:02+5:30
राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार संदीप वाघेरे तब्बल ३७० कोटींहून अधिक मालमत्तेसह शहरातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले

PCMC Election 2026: राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे संदीप वाघेरे ठरले सर्वात श्रीमंत उमेदवार
पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांतून शहरातील कोट्यधीश उमेदवारांची नावे समोर आली आहेत. यामध्ये प्रभाग क्र. २१ मधील राष्ट्रवादी (अजित पवार)चे उमेदवार संदीप वाघेरे तब्बल ३७० कोटींहून अधिक मालमत्तेसह शहरातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरले. त्यांच्या पाठोपाठ याच पक्षाचे प्रभाग क्र. २० मधील उमेदवार योगेश बहल १९३ कोटींच्या मालमत्तेसह कोट्यधीश उमेदवारांच्या यादीत आघाडीवर आहेत.
राष्ट्रवादीचे प्रभाग क्र. २१ मधील उमेदवार संदीप वाघेरे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ३७० कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता नमूद आहे. यामध्ये त्यांच्यासह पत्नीकडे मिळून १६९९ ग्रॅम सोने आणि ३७०० ग्रॅम चांदीचे दागिने आहेत. प्रभाग क्र. २० मधील याच पक्षाचे योगेश बहल यांच्या प्रतिज्ञापत्रात १९३ कोटींची मालमत्ता नमूद आहे. त्यांच्या स्वतःच्या नावे मर्सिडीज बेंज, मुलीच्या नावे रेंज रोव्हर आणि मर्सिडीज-जी, तर मुलाच्या नावे माॅरिस गॅरेज अशा महागड्या मोटारी आहेत.
भाजपच्या पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्र. २८ मधील कुंदा भिसे यांनीही श्रीमंत उमेदवारांच्या यादीत स्थान मिळविले आहे. त्यांच्याकडे १०४ कोटींची स्थावर व जंगम मालमत्ता आहे. याच प्रभागातील भाजपचे दुसरे उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्याकडे ५८ कोटींची मालमत्ता आहे, तर याच प्रभागातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार शीतल काटे यांच्याकडे १४ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ४०० ग्रॅम सोने व ५०० ग्रॅम चांदी असल्याची नोंद आहे.
वाकड-पुनावळे प्रभाग क्र. २५ मधील भाजपच्या उमेदवार रेश्मा भुजबळ यांच्याकडे ५७ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या पतीच्या नावे रेंज रोव्हर, मर्सिडीज बेंझ, फॉर्च्युनर लिजेंडर अशा अलिशान मोटारी आहेत. राम वाकडकर यांच्या प्रतिज्ञापत्रात ५० कोटींची मालमत्ता नमूद आहे.
खासदारपुत्रांकडे २९ कोटींची मालमत्ता, आलिशान मोटारी
पिंपळे निलख-विशालनगर प्रभाग क्र. २६ मधील भाजपच्या उमेदवार स्नेहा कलाटे यांनी ३५ कोटींची मालमत्ता जाहीर केली आहे. थेरगाव-दत्तनगर प्रभाग क्र. २४ मधून शिवसेनेचे उमेदवार विश्वजीत बारणे यांची २९ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्या नावे लेक्सस एलएक्स ६०० व फॉर्च्युनर या आलिशान मोटारींची नोंद आहे. ते खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र आहेत. वाकड-पुनावळे प्रभाग क्र. २५ मधील भाजपचे उमेदवार राहुल कलाटे यांच्याकडे ७३ कोटींची मालमत्ता आहे.