राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 16:40 IST2025-12-24T16:39:55+5:302025-12-24T16:40:47+5:30
मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे.

राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
पिंपरी :चिंचवड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्षाचे) नेते माजी नगरसेवक राहुल कलाटे यांनी मंगळवारी भाजपत प्रवेश केला आहे. मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कलाटे यांचा प्रवेश झाला आहे. यावेळी आमदार शंकर जगताप, भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते.
महापालिका निवडणूक पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून राहुल कलाटे भाजपत प्रवेश करणार की राष्ट्रवादीत? या बाबतच्या चर्चांनी राजकीय वातावरण चांगले ढवळून निघाले होते. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही त्यांना बोलावले होते. तर मागील आठवड्यात कलाटे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
त्यानंतर शनिवारी शहरातील २२ आजी-माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश झाला होता. दरम्यान, कलाटे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाल्यानंतर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शविला होता. त्यानंतर कलाटे यांच्या प्रवेशाचे काय होणार? अशी चर्चा रंगली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळी नऊ वाजताच कलाटे यांच्या समर्थकांनी चलो मुंबई असे स्टेटस ठेवले. त्यानंतर मुंबईत मंगळवारी (दि. २३) दुपारी प्रवेश झाला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, सर्व कार्यकर्त्यांनी ज्या विश्वासाने भाजपात प्रवेश केला आहे, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ दिला जाणार नाही. पूर्ण ताकदीने महापालिका निवडणूक लढविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करूया. आमदार शंकर जगताप म्हणाले, महापालिका निवडणुकीत भाजप अबकी बार सव्वाशे पार होईल.