PCMC Election 2026:अनधिकृत घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलणार;अजित पवारांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:08 IST2026-01-08T11:04:02+5:302026-01-08T11:08:13+5:30
अजित पवार म्हणाले, हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे.

PCMC Election 2026:अनधिकृत घरांना प्रॉपर्टी कार्ड देण्यासाठी शासन स्तरावर पावले उचलणार;अजित पवारांची ग्वाही
चिंचवड : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १७ मधील अनधिकृत घरांचा प्रश्न आणि त्या घरांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून देण्याचा विषय माझ्या अखत्यारीतील असून, तो मीच सोडवू शकतो, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड येथील प्रचार सभेत ते बोलत होते. वाल्हेकरवाडी प्रभाग १७ मधील राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर चिंचवडे, भाऊसाहेब भोईर, शोभा वाल्हेकर, मनीषा आडसूळ यांच्या प्रचारार्थ सभा झाली.
अजित पवार म्हणाले, हा विषय माझा आहे आणि उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या प्रश्नाला न्याय देण्याची जबाबदारी माझीच आहे. प्रभाग १७ मधील नागरिकांना योग्य तो दिलासा मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील.
भाऊसाहेब भोईर यांचे वडील स्व. सोपानराव भोईर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी महापौर होते. त्यांच्या कुटुंबाला महापालिका प्रशासनाचा मोठा अनुभव असून, त्याचा फायदा प्रभागातील विकासकामांना झाला आहे. रस्ते विकास, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांच्या बाबतीत आमच्या उमेदवारांनी सातत्याने आणि प्रभावीपणे काम केले आहे. स्थानिक पातळीवरील प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे आणि आम्ही ती जबाबदारी चोखपणे पार पाडली आहे.