Municipal Election : भाजपची सावध पावले; पहिली यादी आज; महायुती तुटणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2025 16:03 IST2025-12-28T16:02:26+5:302025-12-28T16:03:01+5:30
जागावाटपावरून घटक पक्षांत अस्वस्थता : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण तापले

Municipal Election : भाजपची सावध पावले; पहिली यादी आज; महायुती तुटणार?
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची पहिली उमेदवार यादी आज, रविवारी (दि.२८) जाहीर होणार आहे. भाजपकडून तयारीला वेग आला असतानाच, महायुतीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. जागावाटपावरून मतभेद तीव्र होत असून, महायुती तुटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
भाजपच्या शहर नेतृत्वाने गेल्या काही दिवसांत प्रभागनिहाय सर्वेक्षण, इच्छुकांच्या मुलाखती आणि संघटनात्मक आढावा पूर्ण केला आहे. ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद अधिक आहे, माजी नगरसेवक किंवा प्रभावी स्थानिक चेहरे आहेत, तसेच अलीकडे पक्षप्रवेश झाले आहेत, अशा जागांवर पहिल्याच टप्प्यात उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
मित्रपक्षांत नाराजी; ‘एकतर्फी’चा आरोप
भाजपच्या हालचालींमुळे महायुतीतील शिंदेसेना आणि रिपाइं यांच्यात नाराजीचा सूर वाढला आहे. काही प्रभागांमध्ये मित्रपक्षांनी दावा केलेल्या जागांवर भाजप उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा आहे. अजून जागावाटप अंतिम झालेले नसताना उमेदवार जाहीर करणे म्हणजे युतीधर्माचा भंग आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर उमटू लागली आहे. समाधान न झाल्यास काही प्रभागांत बंडखोर उमेदवार रिंगणात उतरू शकतात.
ही स्ट्रॅटेजिक यादी : भाजपचा खुलासा
भाजप नेतृत्वाकडून मात्र, ही केवळ ‘स्ट्रॅटेजिक’ पहिली यादी असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात मर्यादित जागांवरील उमेदवार जाहीर केले जातील, तर उर्वरित जागांबाबत मित्रपक्षांशी चर्चा सुरू राहील, असा दावा केला जात आहे. तथापि, प्रत्यक्षात किती जागांवर भाजप माघार घेतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीतील तणावाचा फायदा घेण्यासाठी महाविकास आघाडीतील पक्षांनीही हालचाली वाढवल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार) आणि उद्धवसेना यांच्यातील बैठका सुरू असून, महायुतीतील विसंवाद राजकीय संधीमध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आज होणार चित्र स्पष्ट...
भाजपची पहिली उमेदवार यादी केवळ निवडणूक प्रक्रियेची सुरुवात नसून, महायुतीचे भवितव्य ठरवणारा निर्णायक टप्पा ठरणार आहे. रविवारी जाहीर होणाऱ्या यादीत किती जागा, कोणते चेहरे आणि कोणत्या प्रभागांचा समावेश आहे, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.