PCMC Election 2026 : आचारसंहिता उल्लंघनाच्या ७१ तक्रारी; ६ दखलपात्र तर ११ अदखलपात्र गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 15:20 IST2026-01-15T15:19:51+5:302026-01-15T15:20:54+5:30
यामध्ये शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ६ दखलपात्र तर ११ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.

PCMC Election 2026 : आचारसंहिता उल्लंघनाच्या ७१ तक्रारी; ६ दखलपात्र तर ११ अदखलपात्र गुन्हे दाखल
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १५ जानेवारी) मतदान होत आहे. मंगळवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपला. निवडणूक कालावधीतील महिनाभरात आचारसंहिता उल्लंघनाच्या ७१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या सर्व तक्रारी निकाली काढल्या आहेत. यामध्ये शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये ६ दखलपात्र तर ११ अदखलपात्र गुन्हे दाखल केले आहेत.
निवडणुकीच्या अनुषंगाने १५ डिसेंबर २०२५ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत चिखली, एमआयडीसी भोसरी, काळेवाडी, पिंपरी या पोलिस ठाण्यात संबंधित प्रभागातील संबंधितांवर दखलपात्र आणि अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका आचारसंहिता कक्षातर्फे मुख्य कार्यालय तसेच प्रत्येक प्रभाग कार्यालयामध्ये आचारसंहिता व्यवस्थापन कक्ष उभारलेला आहे. तसेच ३७ एफएसटी, ३२ एसएसटी आणि ४४ व्हीएसटी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकांसह पिंपरी-चिंचवड पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागातर्फे विविध कारवाया करण्यात आल्या.
आचारसंहिता तक्रारीत प्रभागात पैसे वाटप होणे, वस्तू अथवा भेटवस्तू देणे, प्रचारासाठी जेवण अथवा आमिष दाखवणे, विनापरवाना फलक, फ्लेक्स, बॅनर उभा करणे यासह नेमून दिलेल्या नियमांचे उल्लंघन करणे अशा तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत, , अशी माहिती महापालिका आचारसंहिता कक्षाच्या प्रमुख सुरेखा माने यांनी दिली.
महापालिका निवडणुकीसाठी आठ क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी नेमून दिले आहेत. त्यातील सर्वाधिक तक्रारी या क प्रभागात होत्या. तर, सर्वात कमी तक्रारी या ह प्रभागातून दाखल झाल्या. राज्य निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी गेल्या असून, त्यांच्यामार्फत महापालिकेकडे त्या वर्ग केल्या आहेत.
जप्त करण्यात आलेल्या वस्तू
बिर्याणी, दारू, वॉशिंग मशीन आदी वस्तू पकडल्या आहेत. त्याचबरोबर प्रचारासाठी वेळेचे बंधन असतानाही त्यानंतर ही प्रचार केला म्हणूनही कारवाई करण्यात आली. पैसे पकडण्याच्या देखील काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मात्र हे पैसे निवडणुकीसाठीच वापरले जाणार आहेत हे अद्याप सिद्ध झालेले नाही.
१५ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत प्रभागनिहाय तक्रारी
प्रभाग - तक्रारी
अ - ३
ब - १०
क - २४
ड - ५
ई - ०
फ - १५
ग - ८
ह - १
इतर - ५
एकूण - ७१
१५ डिसेंबर ते १३ जानेवारी या कालावधीत पोलिस आणि एक्साइजने केलेली कारवाई
रोकड - १८,०२,५००
मद्य - ६२,७९,१७८
वाॅशिंग मशीन - १,२९,५६१
अमली पदार्थ - ६६,३४,५३१
शस्त्र - १० पिस्तूल, १५ काडतुसे, २३ धारदार शस्त्रे
प्रतिबंधात्मक कारवाई - १००४ संशयितांवर