PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणाचे ठेके? कोण रिंग करून पैसे खाते? अजित पवारांचा सवाल
By ज्ञानेश्वर भंडारे | Updated: January 7, 2026 09:17 IST2026-01-07T09:14:51+5:302026-01-07T09:17:47+5:30
- पिंपरीतील राष्ट्रवादीच्या प्रचार सभेत भाजपच्या स्थानिक नेत्यांवर टीका; स्थायी समितीचे अध्यक्ष असताना खाल्लेला पैसा विधानसभा निवडणुकीत कोणी वापरला?

PCMC Election 2026: पिंपरी-चिंचवड महापालिकेत कोणाचे ठेके? कोण रिंग करून पैसे खाते? अजित पवारांचा सवाल
पिंपरी : राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात काही जणांना महापौर केले, एकाला तर स्थायी समितीचे अध्यक्षपद दिले. त्या पठ्ठ्याने स्थायी समितीचा अध्यक्ष असताना भ्रष्टाचाराचा पैसा वापरून विलास लांडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. महापालिकेत कोणाचे ठेके आहेत, कोण रिंग करून पैसे खात आहेत? आता त्यांची प्रॉपर्टी तपासून पहा स्थानिक पातळीवर काय चाललेय, हे पाहायला त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वेळ नसल्याचा फायदा काही लोक घेत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांसाठी सोमवारी (दि. ६) पिंपरीत सभा झाली. यावेळी पवार बोलत होते. पवार म्हणाले की, राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात अनेकांना पदे दिली, तरीही ते गेले. जे गेले, त्यांच्याबद्दल मी खोलात जात नाही. असे कितीतरी येतात-जातात, मला फरक पडत नाही. माझ्या पाठीशी लाडकी बहीण आणि मायबाप जनता आहे.
चाळीस हजार कोटींची कामे कुठे गेली?
अजित पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार आहे, आम्ही सोबत आहोत. याआधी काँग्रेससोबतही आम्ही सत्तेत होतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढत होतो, आजही तशीच परिस्थिती आहे. महापालिकेच्या ठेवी वाढायला हव्या होत्या, पण त्या कमी झाल्या आहेत. सध्या फक्त २१३२ कोटींच्या ठेवी आहेत. २०१७ पासून आतापर्यंत ६० ते ७० हजार कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यातील ३० ते ३२ टक्के आस्थापना खर्च वजा केला, तर उरलेली ४० हजार कोटींची कामे कुठे गेली? महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटले गेले. ४० कोटींचीही कामे दिसत नाहीत. कामांमध्ये रिंग सुरू आहे, अधिकाऱ्यांवर दबाव आहे. लोकांची सहनशीलता किती तपासणार?
शहराची बदनामी, खोदाई माफिया सक्रिय
पवार म्हणाले की, माजी आमदारांच्या पुत्राला स्थायी समितीच्या अध्यक्षपदावर असताना लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. त्यामुळे देशभरात पिंपरी-चिंचवडची बदनामी झाली. शहरात खोदाई माफिया तयार झाले आहेत. डीपी प्लॅनवर ५० हजारांहून अधिक हरकती दाखल झाल्या आहेत, त्याचाही विचार करावा लागेल.
मतदानाच्या वेळी भावनिक होऊ नका!
पवार म्हणाले की, मतदानाच्या वेळी भावनिक होऊ नका. हे सरड्यासारखी भूमिका बदलतील. ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हणत पाया पडतील. पण त्यांना पाडल्याशिवाय त्यांची शेवटची निवडणूक होत नाही. त्यामुळे त्यांना पाडा. माझ्याकडून काही चुका झाल्या, त्या मी मान्य केल्या आहेत. आता शहरासाठी पुढे काय विकास करणार, ते लवकरच सांगेन.