काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; संक्रातीनिमित्त साड्या खरेदीसाठी जाताना काळाचा घाला
By नारायण बडगुजर | Updated: January 14, 2026 19:48 IST2026-01-14T19:48:29+5:302026-01-14T19:48:51+5:30
ऋतुजा आणि नेहा या दोघीही संक्रांतीनिमित्त खरेदीसाठी पुनावळे येथून घरातून बाहेर पडल्या.

काळेवाडीत ट्रकच्या धडकेत दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू; संक्रातीनिमित्त साड्या खरेदीसाठी जाताना काळाचा घाला
पिंपरी : दोन सख्ख्या बहिणी दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला एका ट्रकने धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने दोघी बहिणींचा मृत्यू झाला. काळेवाडी येथील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे बुधवारी (दि. १४ जानेवारी) दुपारी सव्वाएकच्या सुमारास ही घटना घडली.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४), नेहा पांडुरंग शिंदे (२०, दोघीही रा. पुनावळे) असे मृत्यू झालेल्या बहिणींची नावे आहेत. जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) असे संशयित ट्रक चालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काळेवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि नेहा या दोघी दुचाकीवरून जात होत्या. त्यावेळी रहाटणी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली.
या अपघातात ऋतुजा आणि नेहा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक जितेंद्र याला पोलिसांनी ताब्यात घेतले. जितेंद्र हा नागपूर येथून वाटाणा घेऊन पुणे येथे आला होता. तो परत जात असताना ही घटना घडली.
शिंदे दाम्पत्याचा आधार गेला
अपघातात मृत्यू झालेली ऋतुजा ही वकील होती. ताथवडे येथील महाविद्यालयातून तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. नेहा ही महाविद्यालयीन विद्यार्थीनी होती. त्यांचे वडील पांडुरंग शिंदे यांचा मिरची कांडपचा व्यवसाय आहे. तसेच आई कमल या गृहिणी आहेत. शिंदे दाम्पत्याला दोन मुली होत्या. दोघीही आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत असल्याने शिंदे दाम्पत्याच्या आयुष्यात सुखाचे दिवस सुरू झाले होते. मात्र, दोघी मुलींचा अपघातात मृत्यू झाल्याने शिंदे दाम्पत्याचा आधार गेला असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला.
सणाच्या दिवशी शोककळा...
ऋतुजा आणि नेहा या दोघीही संक्रांतीनिमित्त खरेदीसाठी पुनावळे येथून घरातून बाहेर पडल्या. दोघीही पिंपरी येथील मुख्य बाजारपेठेत साड्या खरेदी करण्यासाठी जात होत्या. त्यावेळी काळाने घाला घातला आणि अपघातात दोघींचा मृत्यू झाला. सणाच्या दिवशी झालेल्या या घटनेने पुनावळे परिसरावर शोककळा पसरली होती.