PCMC Election 2026: सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आलाय, त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही - अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 13:17 IST2026-01-07T13:16:58+5:302026-01-07T13:17:53+5:30
PCMC Election 2026 आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत, मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया.

PCMC Election 2026: सत्ताधाऱ्यांना पैशाचा माज आलाय, त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही - अजित पवार
पिंपरी: पिंपरी महापालिकेच्या कारभारावर बोट ठेवत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली. नियोजनशून्य कारभार करण्यात आला. असा आरोप त्यांनी केला होता. आता थेट सत्ताधाऱ्यांवर टीका करत त्यांनी माज जिरवल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशारा त्यांना दिला आहे.
पवार म्हणाले, महापालिकेतील सत्ताधारी कोणाला ठेकेदारीचे काम द्यायचे ते ठरवतात. नाही ऐकले तर काम देत नाहीत. कारभारी बदलले पाहिजेत. त्यांना सत्तेची गुर्मी आली आहे. पैशाचा माज आला आहे. त्यांचा माज जिरवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आम्ही तुतारी आणि घड्याळ एकत्र आलो आहोत. मागचे जे झाले गेले ते गंगेला मिळाले, त्यामुळे आता एकत्रित काम करुया.
शहरातील भ्रष्टाचाऱ्यांचा ‘आका’ संपवायचा आहे
ग्रीन बॉण्ड नावाखाली २०० कोटींचे कर्जरोखे काढले आहेत. यांनी लोकांची घरेदारे पाडली. त्यांना रस्त्यावर आणले. यांच्या हातात सत्ता गेली तर परत शहराचा हे खेळखंडोबा करतील. अनधिकृत घरांमध्ये राहणारे नागरिक आपलेच आहेत. प्रॉपर्टी कार्ड देण्याचे आज एका मंत्र्याने याच ठिकाणी सांगितले. मात्र, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. त्यामुळे तुमच्या प्रॉपर्टी कार्डचा विषय मीच मार्गी लावू शकतो. आपल्याला भ्रष्टाचारासोबत त्यांच्या ‘आका’लाही संपवायचे आहे.
महापालिकेत नियोजनशून्य कारभार
अजित पवार म्हणाले की, भाजपच्या काळात महापालिका कर्जबाजारी झाली. नियोजनशून्य कारभार करण्यात आला. राष्ट्रवादीच्या २५ वर्षांच्या कार्यकाळात शहराचा विकास केला आहे. आम्ही सत्तेत असताना शहरात नवनवीन विकासकामे आणली. मेट्रोचे भूमिपूजन जरी पंतप्रधानांच्या हस्ते झाले असले, तरी प्रकल्प मंजुरीवेळी महापौर राष्ट्रवादीचेच होते. गेल्या नऊ वर्षांत पिंपरी-चिंचवडची काय अवस्था झाली आहे, हे शहरवासीयांना माहीत आहे. संविधानाने सर्वांना आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला आहे. ते आपली भूमिका मांडतील, मी माझी मांडत आहे. शेवटी जनता जनार्दन सर्व ऐकून कौल देईल.