PCMC Election 2026: उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:07 IST2026-01-03T13:07:04+5:302026-01-03T13:07:47+5:30
PCMC Election 2026 दिवसभर फोनाफोनी, बंद खोलीतील चर्चा, भावनिक समजूत, तर काही ठिकाणी राजकीय गणिते मांडण्यापर्यंतचा वेळ पक्षश्रेष्ठींना द्यावा लागला

PCMC Election 2026: उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली! अखेर घेतली माघार, प्रमुख पक्षांना दिलासा
पिंपरी : महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून उफाळलेली बंडखोरी निवळली आहे. तिकीट वाटपानंतर नाराजांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून पक्षांवर दबाव निर्माण केला होता. मात्र, अखेरच्या क्षणी मोठ्या प्रमाणावर अर्ज मागे घेतले गेल्याने प्रमुख पक्षांना दिलासा मिळाला आहे. यात केवळ उमेदवारांचीच नव्हे, तर पक्षश्रेष्ठींचीही दमछाक झाली. ३२ प्रभागांतून ४४३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. तिकीट न मिळाल्याने काही प्रभागांत एकाच पक्षाचे दोन-दोन, तीन-तीन उमेदवार समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता होती. ही परिस्थिती ओळखून वरिष्ठ नेते, निरीक्षक, पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी सलग बैठकांचा धडाका लावला.
दिवसभर फोनाफोनी, बंद खोलीत समजूत
दिवसभर फोनाफोनी, बंद खोलीतील चर्चा, भावनिक समजूत, तर काही ठिकाणी राजकीय गणिते मांडण्यापर्यंतचा वेळ पक्षश्रेष्ठींना द्यावा लागला. काही बंडखोरांनी शेवटच्या क्षणापर्यंत भूमिका बदलण्यास नकार दिल्याने वरिष्ठांची तारांबळ उडाली. अखेर वरिष्ठ नेत्यांच्या थेट हस्तक्षेपानंतर अनेक बंडखोरांनी माघार घेतली. काही अपक्ष उमेदवार आणि अधिकृत पक्षीय उमेदवारांनीही उमेदवारी मागे घेतली.
या प्रमुख उमेदवारांची माघार
राष्ट्रवादीच्या (अजित पवार) महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, वर्षा भालेराव, माजी नगरसेविका सविता वायकर, मनसेच्या गीता चव्हाण, भाजपच्या हर्षदा थोरात, माजी नगरसेवक संजय नेवाळे, आशा शेंडगे, माधवी राजापुरे, मंदा ठाकरे, निर्मला कुटे, सुवर्णा बुर्डे, मंदा आल्हाट, आशा सुपे, निशा यादव, भारती विनोदे, सुनीता तापकीर, माऊली थाेरात, सुषमा तनपुरे, विमल काळे, माधुरी कुलकर्णी, छाया साबळे, काेमल मेवाणी, वैशाली गोरखनाथ तरस, उद्धवसेनेचे विजय गुप्ता, गंगा धेंडे, जयसिंग भाट, कल्पना घंटे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) माधव पाटील, गणेश भोंडवे.