PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला; काल दिवसभरात ३८ जणांचे अर्ज मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 12:51 IST2026-01-02T12:50:20+5:302026-01-02T12:51:32+5:30
PCMC Election 2026 भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, माजी नगरसेविका ममता गायकवाड तसेच राम वाकडकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये बंडखोरांना शांत करण्यासाठी पक्षयंत्रणा कामाला; काल दिवसभरात ३८ जणांचे अर्ज मागे
पिंपरी : महापालिका निवडणुकीत उमेदवारी माघार घेण्याच्या अंतिम टप्प्यात शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे बंधू सचिन लांडगे, माजी नगरसेविका ममता गायकवाड तसेच राम वाकडकर यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. आज, शुक्रवार (दि.२) दुपारी तीनपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत असल्याने बंडखोरांना शांत करण्यासाठी सर्वच पक्षांची धावाधाव सुरू आहे.
शुक्रवारपर्यंत एकूण ३८ उमेदवारांनी ४१ उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयातून सर्वाधिक ११, ‘क’ क्षेत्रीय कार्यालयातून १२, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातून ८, ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयातून ५, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयातून २, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयातून २, तर ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयातून एका उमेदवाराने माघार घेतली आहे. ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातून मात्र एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही.
समित्यांवर संधी देण्याची आश्वासने
दरम्यान, पक्षाने तिकीट न दिल्याने नाराज झालेल्या अनेक इच्छुकांनी दुसऱ्या पक्षातून किंवा अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरीचे निशाण फडकावले होते. भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात याचे प्रमाण अधिक आहे. अशा बंडखोरांना शांत करण्यासाठी शहराध्यक्ष, आमदार, माजी नगरसेवक तसेच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मनधरणी सुरू केली आहे. उमेदवारी मागे घेतल्यास स्वीकृत नगरसेवक, क्षेत्रीय समिती सदस्य, पक्षातील पदे तसेच विविध समित्यांवर संधी देण्याचे आश्वासन देण्यात येत असल्याची चर्चा आहे.
बंडखोरांचे मोबाइल बंद
काही बंडखोरांनी या दबावाला कंटाळून मोबाइल बंद केले आहेत. अशा उमेदवारांचा शोध घेण्यासाठी पक्षांची स्वतंत्र यंत्रणा कामाला लागली आहे. शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत माघार घेता येणार असून, त्यानंतर प्रत्येक प्रभागातील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.