PCMC Election 2026: एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 14:01 IST2026-01-07T13:59:27+5:302026-01-07T14:01:08+5:30
PCMC Election 2026 प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठीचा चार हजारांचा तांत्रिक खर्चही शासन विशेष बाब म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना कार्ड मोफत मिळणार आहे

PCMC Election 2026: एक लाख चिंचवडकरांना मिळणार घरांचे ‘प्रॉपर्टी कार्ड’; प्रचारसभेत चंद्रशेखर बावनकुळे यांची घाेषणा
पिंपरी : बिजलीनगर, चिंचवडेनगर, वाल्हेकरवाडी, शिवनगरी आणि परिसरातील नागरिकांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. आमदार शंकर जगताप यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या निर्णयामुळे एक लाखाहून अधिक घरांना हक्काचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ मिळणार आहे, अशी घोषणा वाल्हेकरवाडी येथे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
प्रभाग १७ मधील भाजपचे उमेदवार नामदेव ढाके, आशा सूर्यवंशी, पल्लवी वाल्हेकर आणि सचिन चिंचवडे यांच्या प्रचारार्थ मंगळवारी (६ जानेवारी) झालेल्या सभेत ते बोलत होते. शामराव वाल्हेकर, तात्यासाहेब आहेर, माजी नगरसेवक श्रीधर वाल्हेकर, राजेंद्र साळुंखे, संदीप चिंचवडे, बिभीषण चौधरी, मनोज तोरडमल, विनोद कांबळे, श्रुती तोरडमल, खंडूदेव कठारे, सचिन शिवले, नीलेश भोंडवे, दिलीप गोसावी, दिलीप गडदे, वाल्मिक शिवले, चंद्रहास वाल्हेकर, संदीप शिवले, प्रवीण वाल्हेकर, शिरीष कर्णिक, कविता दळवी, ग्रेस कुलकर्णी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, आमदार शंकर जगताप यांच्यामुळे चिंचवडमधील प्रलंबित महसूल प्रश्न सुटले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील घरांना आता अधिकृत राजमान्यता मिळणार असून, बँकिंग व्यवहार, कर्ज आणि मालमत्तेची विक्री सुलभ होणार आहे. सरकारने तुकडाबंदी कायदा रद्द केल्यामुळे शासकीय जागांवरील अनधिकृत घरांच्या मालकी हक्काचा प्रश्न निकाली निघाला असून, निवडणुकीनंतर प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय सरकार घेणार आहे. डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता ‘नक्षा’ योजनेंतर्गत ड्रोन सर्वेक्षण करणार आहे. यामुळे प्रत्येक घराचा अधिकृत सरकारी नकाशा नागरिकांना मोबाईलवर मिळेल. प्रॉपर्टी कार्ड मिळवण्यासाठीचा चार हजारांचा तांत्रिक खर्चही शासन विशेष बाब म्हणून स्वतः उचलणार असून, नागरिकांना कार्ड मोफत मिळणार आहे.
बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवडमधील गरजू नागरिकांसाठी एक लाख नवीन घरे उपलब्ध करणार आहेत. महिला सक्षमीकरणाला बळ देण्यासाठी प्रभागातील २००० बचत गटांना प्रत्येकी एक लाख रुपयांचे अनुदान सरकार देणार आहे.