Devendra Fadnavis: संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडवा, बाकीच्या लोकांचे पतंग कापा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 13:58 IST2026-01-12T13:56:20+5:302026-01-12T13:58:05+5:30
PCMC Election 2026 ‘यह तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण होणार आहेत

Devendra Fadnavis: संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडवा, बाकीच्या लोकांचे पतंग कापा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पिंपरी : मागील वेळी महापालिकेत भाजपने सत्तापालट केला आणि आताही भाजपच जिंकणार आहे. आता संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडाला पाहिजे, बाकीच्या लोकांचे पतंग कटले पाहिजेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भोसरीत केले. भाजपच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस यांचा ‘रोड शो’ झाला. त्यात ते बोलत होते. यावेळी भोसरीचे आमदार महेश लांडगे, चिंचवडचे आमदार शंकर जगताप उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, भोसरीचा चेहरा महेश लांडगे यांनी बदलला आहे. ‘यह तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण होणार आहेत. आपण प्रत्येकवेळी लांडगे यांना ताकद दिली. यावेळी या नगरसेवकांना ताकद द्या. त्यांना ताकद मिळाली की, भाजप आणि आम्हाला ताकद मिळणार आहे. १६ तारखेनंतर तुमची काळजी करायला आम्ही आहोत.
‘क्यों पडे हो चक्कर में, कोई नही टक्कर में’ अशी शेरोशायरी करीत फडणवीस म्हणाले की, संक्रांतीचा सण जवळ आला आहे. त्यावेळी लोक पतंग उडवितात. निवडणुकीचा सण आला आहे. आता कमळाचा पतंग उडविला पाहिजे. बाकीचे पतंग कटले पाहिजेत.
‘रोड शो’ला उशीर, मुख्यमंत्री पुण्याकडे रवाना
भोसरीतील पीएमटी चौक येथे सायंकाळी सहाच्या सुमारास मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार होते. मात्र, त्यांना यायला उशीर झाला. साडेसातच्या सुमारास आल्यानंतर ‘रोड शो’ला सुरुवात झाली. त्यामध्ये ढोल, ताशा, हलगी पथके सहभागी झाली होती. कार्यकर्त्यांनी फेटे परिधान केले होते. उत्साह अपूर्व होता. हा ‘रोड शो’ पीएमटी चौकामार्गे दिघी रस्ता आणि आळंदी रस्त्याने पुन्हा पीएमपी चौकाकडे येत असताना रात्रीचे पावणेआठ वाजले. त्यामुळे पीएमटी चौकात संपणारा ‘रोड शो’ काही अंतर अलीकडेच गवळी मंगल कार्यालयाजवळ थांबविला. रथातूनच मुख्यमंत्र्यांनी तीन मिनिटांचे भाषण केले आणि ‘रोड शो’ सोडून पुण्याकडे पुढील कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले.
नागरिकांना वाहतूक कोंडीचा फटका
भाजपचा ‘रोड शो’ झाला. त्यामुळे सायंकाळी पाचपासून भोसरी गावातील पीएमटी चौकात येणारी वाहतूक वळविली होती. पुणे-नाशिक रस्त्यावरील भोसरी पीएमपी चौकामध्ये न येता पुलावरून सोडली होती. लांडेवाडी चौकापासून, आळंदी रस्त्याकडून येणारी वाहने वाहतुकीसाठी बंद केली होती. त्यामुळे सायंकाळच्या वेळी स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागला.