PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 15:07 IST2026-01-07T15:07:34+5:302026-01-07T15:07:48+5:30
PCMC Election 2026 पिंपरी चिंचवडमधील २०१२ च्या निवडणुकीमध्ये खंबीर नेतृत्वाशिवाय काँग्रेस भरकटली. जागा कमी झाल्या, तर शिवसेना आणि भाजपला उभारी मिळाली.

PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक; २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेस निर्विवाद, भाजप, शिवसेना ताकद वाढली
पिंपरी : महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा निर्विवाद सत्ता मिळवली. या निवडणुकीमध्ये खंबीर नेतृत्वाशिवाय काँग्रेस भरकटली. जागा कमी झाल्या, तर शिवसेना आणि भाजपला उभारी मिळाली. मनसेनेही चार जागा मिळवून शहरात खाते उघडले. राष्ट्रवादीच्या महापौर म्हणून मोहिनी लांडे यांना संधी मिळाली.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या २०१२ च्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीमध्ये २०११ च्या जनगणनेनुसार १७ लाख ५० हजार लोकसंख्या होती. दोन सदस्य प्रभाग पद्धतीने ही निवडणूक झाली. १२८ वॉर्डांचे ६४ प्रभाग करण्यात आले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप आणि शिवसेना, मनसे अशी लढत झाली होती. या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोर लावला होता. त्या तुलनेमध्ये राज्यात सत्ता असतानाही काँग्रेसच्या वतीने फारसे प्रयत्न झाले नाहीत. मात्र, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोर लावला.
या निवडणुकीमध्ये सर्वाधिक ८३ जागा राष्ट्रवादीला मिळाल्या. त्यामध्ये विद्यमान महापौर योगेश बहल, आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे, भाऊ विश्वनाथ लांडे, भाचेजावई महेश लांडगे, माजी स्थायी समिती अध्यक्ष प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी पदाधिकारी पुन्हा निवडून आले. स्थायी समितीच्या अध्यक्षा सुमन पवळे यांचा मनसेचा नवीन चेहरा अश्विनी मराठे-चिखले यांनी पराभव केला. या निवडणुकीत चिंचवड मतदारसंघामध्ये आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्व समर्थकांना निवडून आणण्यात जोरदार योगदान दिले. तर त्या तुलनेमध्ये शहराध्यक्ष आझम पानसरे, आमदार विलास लांडे यांना आपल्या अधिकाधिक समर्थकांना निवडून आणण्यात यश मिळाले नाही. मात्र, महापौर म्हणून मोहिनी लांडे यांना महापौरपदी संधी मिळाली.
या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला निर्विवाद यश मिळाले. मात्र, या निवडणुकीमध्ये ‘क्रॉस व्होटिंग’ मोठ्या प्रमाणावर झाले. माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांचा पराभव झाला. तर अरुणा भालेकर, सुरेश म्हेत्रे, भारती फरांदे, उषा वाघेरे, समीर मासुळकर, मोरेश्वर भोंडवे हे अपक्ष म्हणून निवडून आले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ८५ नवीन चेहरे दिसून आले. ६५ महिला निवडून आल्या होत्या. ३४ नगरसेवक पुन्हा सभागृहात आले होते.
या निवडणुकीतील प्रश्न
या निवडणुकीमध्ये समाविष्ट गावांचा रखडलेला विकास, पिण्याचे पाणी, अनधिकृत बांधकाम नियमितीकरण, रेड झोन हद्द कमी करणे असेच विषय चर्चिले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आर. आर. पाटील, जयंत पाटील यांच्या सभा झाल्या. त्याचबरोबर नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे यांच्याही सभा गाजल्या. मनसेची निर्मिती झाल्यानंतर राज ठाकरेंनीही पहिली सभा घेतली. त्यामुळे पहिल्याच निवडणुकीमध्ये चार जागांवर मनसेचे उमेदवार निवडून आले आणि महापालिकेत खाते उघडले. सत्तेत सहभागी असणारी काँग्रेस खचली. त्या तुलनेत शिवसेना आणि भाजपच्या जागा वाढल्याचे दिसून येते.
३४ नगरसेवक पुन्हा पालिका सभागृहात
महापौर योगेश बहल, माजी महापौर मंगला कदम, अपर्णा डोके, उपमहापौर डब्बू आसवानी, सत्तारूढ पक्षनेते जगदीश शेट्टी, सुलभा उबाळे, श्रीरंग बारणे, सीमा सावळे, वसंत लोंढे, जगदीश शेट्टी, उल्हास शेट्टी, तानाजी खाडे, जावेद शेख, राजू मिसाळ, भाऊसाहेब भोईर, प्रभाकर वाघेरे, उषा वाघेरे, मोहिनी लांडे, जितेंद्र ननावरे, महेश लांडगे, अजित गव्हाणे, गुरुबक्ष पेहलानी, जयश्री गावडे, आशा सूर्यवंशी, नंदा ताकवणे, आर. एस. कुमार, वर्षा मडिगेरी, दत्ता साने, शांताराम भालेकर, चंद्रकांता सोनकांबळे, शकुंतला धराडे, राजेंद्र काटे, कैलास थोपटे, प्रशांत शितोळे या एकूण ३४ आजी नगरसेवकांना पुन्हा संधी मिळाली आहे.
माजी नगरसेवक पुन्हा पालिकेत
झामाबाई बारणे, नारायण बहिरवाडे, ॲड. गौतम चाबुकस्वार, सुनीता वाघेरे, सविता साळुंके, शमीम पठाण, विलास नांदगुडे, अमिना पानसरे, विमल जगताप या नऊ माजी नगरसेवकांना महापालिकेत पुन्हा संधी मिळाली.
यांच्या पदरी आले अपयश
सुलोचना भोवरे, सुरेखा बोरुडे, चंद्रकांत नखाते, अमृत पऱ्हाड, मनोहर पवार, विश्वास गजरमल, जयश्री वाघमारे, राजू दुर्गे, रवींद्र खिलारे, अशोक कुलांगे, बेबी कुटे, सविता वायकर, अप्पा बागल, संजय दुर्गुळे, गीताराम मोरे, रामचंद्र माने, विद्या नवले, राजाभाऊ गोलांडे, जगदीश तिमय्या शेट्टी, प्रतीक झुंबरे, सुखदेवी नाटेकर, मुक्ता पडवळ, डॉ. कमरुन्निसा खान, विजय कापसे, अल्फान्सा डेनिस, शांती सेन, मीना नाणेकर, प्रकाश मलशेट्टी, शकुंतला साठे, धनराज बिर्दा, सुरेखा लांडगे, श्याम लांडे, भाऊसाहेब सुपे, विजय लांडे यांच्यासह ३५ माजी नगरसेवकांना अपयश आले.
२०१२ निवडणूक
एकूण जागा - १२८
राष्ट्रवादी काँग्रेस - ८३
काँग्रेस - १४
शिवसेना - १४
भाजप - ३
मनसे - ४
आरपीआय - १
अपक्ष - ९