PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना उमेदवारी नाकारली; अपक्ष लढण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:39 IST2026-01-02T10:38:21+5:302026-01-02T10:39:32+5:30
PCMC Election 2026 पक्षाकडून इच्छुक असलेल्या ‘अजित पवार’ यांनी उमेदवारी देण्यात यावी याबाबत विनंती करूनही त्यांना पक्षाकडून ‘एबी फाॅर्म’ देण्यात आला नाही

PCMC Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना उमेदवारी नाकारली; अपक्ष लढण्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता
पिंपरी : उमेदवारीवरून राज्यभर महापालिका निवडणुकांचे ‘रण’ तापले असताना पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून इच्छुक असलेल्या ‘अजित पवार’ यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांना पक्षाकडून ‘एबी फाॅर्म’ देण्यात आला नाही. यावरून शहरात चर्चा रंगली आहे.
महापालिकेच्या प्रभाग २५ ‘ड’ या सर्वसाधारण प्रवर्गातून अजित पोपट पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ते गेल्या दहा वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी महापालिकेची निवडणूक लढविण्यासाठी मोठी तयारी केली होती. राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. त्यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन संधी देण्याची विनंती केली होती. पक्षातर्फे इच्छुक उमेदवारांच्या घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्येही त्यांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र, त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे आता त्यांच्याकडे अपक्ष म्हणून लढण्याचा पर्याय आहे. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतील का, हे शुक्रवारी समजणार आहे.
नामसाधर्म्यामुळे चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नामसाधर्म्य असल्याने ताथवडे येथील व्यावसायिक अजित पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होत आहे. ‘अजित पवार पिंपरी-चिंचवड महापालिकेतून निवडणूक लढणार’, अशी चर्चा सोशल मीडियावरही होत आहे.
‘अपक्ष लढण्याबाबत निर्णय झालेला नाही’
मला उमेदवारी देण्यात यावी, अशी विनंती उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. मात्र, पक्षाकडून मला ‘एबी फाॅर्म’ देण्यात आला नाही. आता अपक्ष लढायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेतलेला नाही, असे व्यावसायिक अजित पवार यांनी सांगितले.