PCMC Election 2026: निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने ५ पोलिसांचे निलंबन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:57 IST2026-01-15T16:55:53+5:302026-01-15T16:57:02+5:30

PCMC Election 2026 निलंबित केलेले पोलिस अंमलदार मागील काही महिन्यांपासून रजेवर गेले असून त्यांना पत्र पाठवून कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले

PCMC Election 2026 5 policemen suspended for being absent during election period; Pimpri-Chinchwad police takes action | PCMC Election 2026: निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने ५ पोलिसांचे निलंबन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

PCMC Election 2026: निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने ५ पोलिसांचे निलंबन; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

पिंपरी : निवडणूक काळात गैरहजर राहिल्याने पिंपरी-चिंचवड शहर पोलिस दलातील पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले. याबाबतचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. पोलिस हवालदार संजय केळकर, सागर बाविस्कर, पोलिस जगन्नाथ शिंदे, प्रतिभा गावडे, संतोष जाधव अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावे आहेत. हे सर्वजण पोलिस मुख्यालयात नेमणुकीस आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (दि. १५ जानेवारी) मतदान झाले. त्यापूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील तळेगाव, आळंदी, चाकण नगरपरिषदांची निवडणूक झाली. आता पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, या कालावधीत शहरात अनेक महत्त्वाचे राजकीय नेते शहराचा दौरा करत आहेत. अशा कालावधीत मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केला जातो. मनुष्यबळाअभावी त्या मनुष्यबळावर पोलिसांना संपूर्ण कामकाज करावे लागते.

निलंबित केलेले पोलिस अंमलदार मागील काही महिन्यांपासून रजेवर गेले आहेत. त्यांना पोलिस मुख्यालयाकडून अनेक वेळेला पत्र पाठवून कर्तव्यावर हजर होण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कारवाईचा बडगा उगारत पोलिस आयुक्तांनी पाच जणांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. कर्तव्यावर हजर न राहण्याबाबत त्यांची विभागीय चौकशी सुरू राहणार असल्याचे आदेशात नमूद आहे.

‘त्या’ सहा पोलिसांवरही होणार कारवाई?

सातत्याने गैरहजर राहणाऱ्या इतर ११ पोलिसांनाही हजर होण्याचे आदेश दिले होते. त्यातील पाच पोलिस हजर झाले आहेत. उर्वरित सहा जणांनी आदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: PCMC Election 2026 5 policemen suspended for being absent during election period; Pimpri-Chinchwad police takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.