पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 11:39 IST2025-03-11T11:35:15+5:302025-03-11T11:39:14+5:30
- शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका

पिंपरी-चिंचवडवर अजितदादांची खप्पामर्जी; शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही
पिंपरी : शहरात महायुतीचे, सत्ताधारी पक्षाचे पाच आमदार आहेत. मात्र, अर्थसंकल्पात पिंपरी- चिंचवड शहराला ठेंगा मिळाला आहे. शहरासाठी नवीन प्रकल्प किंवा निधी जाहीर झाला नाही, त्यामुळे अर्थमंत्री अजित पवार यांचे शहरावरील प्रेम कमी झाल्याची टीका होत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भोसरीतून भाजपचे आमदार महेश लांडगे, चिंचवड येथून भाजपचे आमदार शंकर जगताप, पिंपरीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे, विधान परिषदेचे आमदार उमा खापरे, अमित गोरखे असे एकूण पाच आमदार आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये पवना नदी सुधार प्रकल्प, मेट्रोचा विस्तारित मार्ग, उद्योग, शहरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना निधी मिळेल, अशी अपेक्षा होती. नवीन योजनेत शहराचा समावेश असेल, अशी अपेक्षा होती. मात्र, एकाही प्रकल्पाला निधी मिळाला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पांना निधी मिळण्याची होती अपेक्षा
मेट्रोच्या वतीने पिंपरी ते निगडी हा प्रकल्पाचे काम सुरू आहे. निगडी ते किवळे मुकाई चौक आणि मुकाई चौक ते वाकड, वाकड ते नाशिक फाटा आणि नाशिक फाटा ते चाकण असे चार मेट्रोचे मार्ग प्रस्तावित आहेत. शहरातून निगडी ते दापोडी हा राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यासाठी निधी आणि कामगार रुग्णालय विस्तार, पवना नदी सुधार प्रकल्पास तरतूद होण्याची अपेक्षा होती. मात्र, एकाही प्रकल्पास निधी नाही.
उद्योगांना ठेंगा
पिंपरी-चिंचवड औद्योगिक नगरी आहे. या औद्योगिक नगरीतील विकासाला चालना देण्यासाठी निधी किंवा योजना मिळण्याची अपेक्षा होती. तसेच कर सवलत आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनांनी पाठपुरावा केला होता. मात्र, अर्थसंकल्पात उद्योगांसाठी काहीही नसल्याचे दिसून आले. तसेच उद्योगांसाठी राज्य शासनाचा कोणताही नवीन प्रकल्प जाहीर झाला नाही.
अजितदादांचे प्रेम झाले कमी..!
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री अशा तीनही जबाबदाऱ्या अजित पवार सांभाळत आहेत. पिंपरी-चिंचवड हे अजितदादांचे आवडते शहर. मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीही तरतूद केली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. अजितदादांचे शहरावरील प्रेम कमी झाले आहे, अशीही टीका होऊ लागली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये विकास कामांच्या केवळ मोठमोठ्या घोषणाच केलेल्या दिसून येतात. जवळपास एक लाख कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना या सर्व योजना पूर्ण करण्यासाठी निधी कुठून उपलब्ध होणार. या संदर्भातले स्पष्टीकरण अर्थमंत्र्यांना देता आले नाही. वाहनांवरील करांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केल्यामुळे वाहनांच्या किमती वाढतील, त्याचा विपरीत परिणाम उद्योगधंद्यांवर होण्याची शक्यता आहे. थोडक्यात अर्थसंकल्प म्हणजे ‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’ असे त्याचे वर्णन करावे लागेल. - मानव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते