पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पात ४१४ कोटींची वाढ; ११०० नवीन उपसूचनांचा समावेश, नगरसेवकांना प्रत्येकी १० लाखांचा निधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 15:50 IST2026-03-24T15:50:22+5:302026-03-24T15:50:44+5:30
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महत्त्वाकांक्षी अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेत सादर: पाणी, पायाभूत सुविधा, सामाजिक प्रकल्पांना प्राधान्य

पिंपरी-चिंचवड अर्थसंकल्पात ४१४ कोटींची वाढ; ११०० नवीन उपसूचनांचा समावेश, नगरसेवकांना प्रत्येकी १० लाखांचा निधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन २०२६-२७ च्या ९३२२.१७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात ४१४.२२ कोटी रुपयांची वाढ सुचविण्यात आली असून, स्थायी समितीमार्फत ते मंजुरीसाठी सभेकडे ठेवण्यात आले आहे. जुन्या कामांसाठी १३०० कोटी तर नवीन कामांसाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी हे अंदाजपत्रक महापौर रवी लांडगे यांच्याकडे सादर केले. महापौर रवी लांडगे यांनी सर्वसाधारण सभेत मंगळवारी (दि.२४) मंजुरी दिली. यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, नगरसचिव मुकेश कोळप आदी उपस्थित होते.
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने बांधकाम परवानगी विभागात २५८ कोटींची वाढ अपेक्षित आहे. शासकीय मोजणी व ‘ना हरकत’ दाखले प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्याने गृह व व्यावसायिक प्रकल्पांना गती मिळाली आहे. मालमत्ता करातून ५० कोटी, होर्डिंग परवान्यांतून ३४ कोटी, पाणीपट्टीतून २० कोटी आणि इतर स्रोतांतूनही उत्पन्न वाढण्याचा अंदाज आहे.
प्रभागनिहाय विकासाला चालना
शहरातील ३२ प्रभागांतील सुमारे ११०० नवीन कामांचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला असून, त्यासाठी १९६.९० कोटींची तरतूद आहे. यासोबतच प्रत्येक नगरसेवकाला प्रभागातील तातडीच्या कामांसाठी १० लाख रुपयांचा स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १२८ नगरसेवकांसाठी एकूण १३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून रस्ते, गटारे, पदपथ दुरुस्ती, उद्यान सुशोभीकरण यांसारखी कामे स्थानिक पातळीवर जलद पूर्ण होणार आहेत.
पाणीपुरवठा व पायाभूत सुविधांवर भर
पवना धरणातून निगडीपर्यंत समांतर जलवाहिनी टाकण्याचा १०० कोटींचा प्रकल्प हाती घेण्यात येणार असून, यावर्षी ४० कोटींची तरतूद आहे. शहराला सध्या ६५८ एमएलडी पाणीपुरवठा होत असून, गळती रोखणे व शुद्ध पाणी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत.
महत्त्वाचे प्रकल्प
महिला स्वसंरक्षण केंद्र – ५ कोटी
डिजिटल स्कूल (सीबीएसई दर्जा) – २ कोटी
रतन टाटा म्युझियम – २ कोटी
‘अजितसृष्टी’ स्मारक – ५ कोटी
आरोग्य हेल्पलाईन – ३ कोटी
सोलर प्रकल्प – ५ कोटी
पवना रिव्हर फ्रंट – १५ कोटी
मलनिस्सारण सुधारणा – २० कोटी
ई-व्ही चार्जिंग स्टेशन – १.५ कोटी
सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम
बेघरांसाठी निवारे, सॅनिटरी नॅपकिन मशीन, ऑक्सिजन पार्क, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कामगार कट्टे, हॉकर्स झोन अशा उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे.
वाहतूक व शहर विकास
शहरातील चौक सिग्नलमुक्त करण्याचे नियोजन, ‘पे अँड पार्क’ धोरण, तसेच बीआरटी कॉरिडॉरमधून ४० कोटींची वाढ अपेक्षित असून, उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रकल्पांना चालना मिळणार आहे.
भटक्या श्वानांसाठी निवारागृह
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ५ हजार श्वान क्षमतेची निवारागृहे उभारण्यात येणार असून, त्यासाठी ६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
