प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 13:30 IST2024-12-08T13:29:55+5:302024-12-08T13:30:11+5:30
माझ्या प्रचारामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती–एकही मत विकत घेतले नव्हते, निकाल हा अनपेक्षित असला तरी, हा पराभव अंतिम नाही

प्रस्थापित राजकारणी नसतानाही मतदार कुटुंबासारखे मागे उभे राहिले याचा आनंद - सुलक्षण शिलवंत
पिंपरी : आयुष्यात जय-पराजय हा यशस्वी प्रवासाचा भाग असतो. एका पराजयाने खचून न जाता, नव्या उमेदीनं, आत्मविश्वासानं आणि जोमाने पुढे वाटचाल करत राहणं, हेच खऱ्या कार्यकर्त्याचं लक्षण असतं. दुसऱ्यांच्या प्रलोभनांना व दबावांना न जुमानता साथ दिली. प्रस्थापित राजकारणी नसतानादेखील आपण एका कुटुंबासारखं माझ्या मागे उभं राहिलात, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या डॉ. सुलक्षणा शिलवंत यांनी व्यक्त केली.
आभार मेळाव्यास माजी आमदार ॲड. गौतम चाबूकस्वार, माजी नगरसेवक तुषार कामठे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, दत्ता वाघिरे, विशाल काळभोर, गिरीश कुटे, इमरान शेख, संदीप चव्हाण, धम्मदीप साळवे, गणेश दातीर पाटील, राजरत्न शीलवंत आदी उपस्थित होते.
शिलवंत म्हणाल्या, 'माझ्या प्रचारामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती–एकही मत विकत घेतले नव्हते. हात जोडून प्रामाणिकपणे विश्वास मागितला होता आणि मला अभिमान आहे की आपणही तो प्रामाणिकपणा जपला. निकाल हा अनपेक्षित असला तरी, हा पराभव अंतिम नाही; तो केवळ पुढच्या विजयाच्या मार्गावरचा टप्पा आहे. आपण दिलेल्या प्रेमामुळे व समर्थनामुळे मी अधिक ताकदीनं काम करणार आहे. विरोधकांकडे इतका मोठा फौजफाटा असताना एक-एक मत त्यांना विकत घ्यावा लागलं. बहात्तर हजार मतदान एकही रुपयात न वाटता मिळवले याचा अभिमान वाटतो.'