अखेर झालं मनोमिलन.. ! खासदार बारणे अन् जगताप यांची होणार प्रेस कॉन्फरन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 14:04 IST2019-04-08T14:02:25+5:302019-04-08T14:04:18+5:30
बारणे आणि जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र लोकसभा निवडणुकीला दोघांच्या पक्षाची युती झाली.

अखेर झालं मनोमिलन.. ! खासदार बारणे अन् जगताप यांची होणार प्रेस कॉन्फरन्स
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष, चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज सोमवारी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे दोघांमध्ये मनोमिलन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पत्रकार परिषदेत काय होणार याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरीत एक वाजता बारणे आणि जगताप दोघे संयुक्तपणे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे त्यांच्यातील नाराजीवर पडदा पडला असून मनोमिलन झाले आहे. बारणे आणि जगताप यांच्यात छत्तीसचा आकडा होता. मात्र लोकसभा निवडणुकीला दोघांच्या पक्षाची युती झाली. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार मावळची जागा शिवसेनेकडेच राहिली. बारणे यांनाच पुन्हा शिवसेनेची उमेदवारी मिळाली. युती धमार्चे पालन करू अशी हमी जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. तर, बारणे यांनी पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी यांना बसविण्यासाठी मित्र पक्षाचे काम करावे, असे आवाहन केले होते.
शिवसेना-भाजप नेत्यांनी बारणे आणि जगताप यांच्यात 'समेट' घडविण्यासाठी प्रयत्न केला. मावळ मतदारसंघ जिंकणे किती महत्वाचे आहे हे सांगितले. त्यानंतर दोघांनीही एक पाऊल माघे घेतले. बारणे यांनी यापूर्वीच मतभेदाला पूर्णविराम दिला होता. त्यानंतर जगताप यांनी देखील एक पाऊल मागे घेतले आहे. मात्र पत्रकार परिषदेत काय होणार याबाबत उत्सुकता आहे.