पुण्यातून एक जण परदेशात पळून गेला; पासपोर्ट कोणी दिला, कसा दिला? पवारांचा मोहोळ यांच्यावर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:06 IST2026-01-03T13:05:30+5:302026-01-03T13:06:28+5:30
जनतेमध्ये संशय निर्माण होतोय, कोणाला वाचवण्यासाठी काही दडपण आहे का? याचाही खुलासा केला जाईल

पुण्यातून एक जण परदेशात पळून गेला; पासपोर्ट कोणी दिला, कसा दिला? पवारांचा मोहोळ यांच्यावर निशाणा
पिंपरी : पुण्यातून एक गुन्हेगार व्यक्ती परदेशात पळून गेली आहे. त्याला पासपोर्ट कोणी दिला, कसा दिला, याची चौकशी झाली पाहिजे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शुक्रवारी (दि. २) पत्रकार परिषदेत निशाणा साधला.
केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पवार यांच्यावर टीका करताना, एकीकडे कोयता गँग संपवा, गुन्हेगारी संपवा म्हणतात आणि पाहा, प्रत्यक्षात ते उमेदवारी कोणाला देतात? राजकारण्यांची ती जबाबदारी आहे, शेवटी पुणेकर त्यांना उत्तर देतील, असा टोला लगावला होता. त्याला पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
पवार म्हणाले की, एखादी व्यक्ती गुन्ह्याच्या आरोपाखाली असताना परदेशात कशी काय जाते? पासपोर्ट देताना काय तपासणी झाली? कोणाच्या शिफारशीने तो पासपोर्ट मिळाला? फक्त आरोप झाले म्हणजे कोणी गुन्हेगार ठरत नाही; पण अशा प्रकरणांत पारदर्शक चौकशी झाली पाहिजे. नाही तर जनतेमध्ये संशय निर्माण होतो. या प्रकरणाबाबत अधिक माहिती मी पुण्यात होणाऱ्या पत्रकार परिषदेत सविस्तर मांडणार आहे. कोणाला वाचवण्यासाठी काही दडपण आहे का, याचाही खुलासा केला जाईल.