ऐतिहासिक! एकाच जिल्ह्यातील सात खासदार; समाजवादी पार्टीची उत्तर प्रदेशात मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:00 PM2024-06-05T15:00:20+5:302024-06-05T15:05:36+5:30

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 'हाता'ची साथ मिळाल्याने समाजवादी पार्टीने चांगले यश मिळवले.

देशाच्या सत्तेचा मार्ग ज्या उत्तर प्रदेशमधून जातो तिथे 'इंडिया' आघाडीने चांगली कामगिरी केली. उत्तर प्रदेशात 'सपा'ने राजकीय पंडितांना धक्का देत ३७ जागांवर विजय मिळवला.

२०१९ मध्ये 'सपा'ला राज्यात केवळ पाच जागा जिंकता आल्या होत्या. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या 'हाता'ची साथ मिळाल्याने समाजवादी पार्टीने चांगले यश मिळवले. येथील इटावा या एकाच जिल्ह्यातील सात नेते लोकसभेचे सदस्य बनले आहेत.

हा या लोकसभा निवडणुकीत अनोखा विक्रम झाला आहे. एकाच जिल्ह्यातील हे सर्व नेते उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या लोकसभा जागांवरून जिंकून संसदेत पोहोचले. ही सर्व मंडळी समाजवादी पार्टीच्या तिकिटावर निवडून आली.

१९९९ नंतर समाजवादी पार्टीने उत्तर प्रदेशात चमकदार कामगिरी केली आणि यावेळी ३७ जागा जिंकल्या. हा विजय समाजवादी पार्टी आणि 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांमुळे शक्य झाला.

यावेळी लोकसभा निवडणुकीत इटावामध्ये राहणाऱ्या सात नेत्यांनी अनोखा विक्रम केला. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील वेगवेगळ्या जागांवर विजयी होऊन संसदेत पोहोचले.

त्यात इटावामधून जितेंद्र दोहरे, स्वत: सपा प्रमुख अखिलेश यादव कन्नौजमधून, डिंपल यादव मैनपुरीतून, धर्मेंद्र यादव आझमगडमधून, आदित्य यादव बदायूमधून, अक्षय यादव फिरोजाबादमधून आणि देवेश शाक्य हे एटामधून विजयी झाले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत अखिलेश यादव यांनी अतिशय हुशारीने तिकीट वाटप केले. यावेळी त्यांनी आपल्या कुटुंबाशिवाय इतर कोणत्याही यादव उमेदवाराला तिकीट दिले नाही.

एवढेच नव्हे तर केवळ चार मुस्लिम उमेदवार उभे केले. परिस्थिती अशी होती की यादव कुटुंबातीलच फक्त पाच सदस्य जिंकले नाहीत तर सर्व मुस्लिम उमेदवारही जिंकून संसदेत पोहोचले.

रामपूर, कॅराना, मुरादाबाद आणि संभल या जागांवर समाजवादी पार्टीने मुस्लिम उमेदवार उभे केले होते.