'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:34 IST2026-01-10T14:26:09+5:302026-01-10T14:34:02+5:30
Ganesh Naik Eknath Shinde Latest News: नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री गणेश नाईक आणि शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात घमासान सुरू आहे. आता गणेश नाईकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

"भाजपाचे केंद्रीय नेतृत्व दिलेल्या शब्दाला जागणारं नेतृत्व आहे, असं माझं मत आहे. म्हणून आता आपली गरज संपल्यानंतरही घटक पक्षांना बाजुला करू नये, या अतिशय चांगुलपणाच्या भावनेपोटी केंद्रीय नेतृत्वाने या गोष्टी करण्यास मनाई केली आणि परिणामी काही ठिकाणी युती झाली", अशी माहिती गणेश नाईक यांनी एका मुलाखतीत दिली. गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंवर नाव न घेता गंभीर आरोप केले.

गणेश नाईक म्हणाले, "मी आज सांगतो २०२९ मध्ये मतदार पुनर्रचना होईल ना, त्यावेळी सगळ्यांची चित्र स्पष्ट होतील. होत्याचं नाहीसं होऊन जाईल. जनतेला माहिती आहे की प्राबल्य कुठून आणि कसं आलं? मी बोललो पैसा कमवा, पण तो कुठल्या मार्गाने आला, तो मार्ग जनसामान्यांना पटवून द्या."

"आता मी हे बोललो ना की, हरामाचा पैसा वाटायला सुरूवात केली. मी बोलतोय. नवी मुंबईची जनता इतकी स्वाभिमानी आणि सुजाण आहे की, तो पैसा घेणार नाही. भाजपाने सगळी जबाबदारी गणेश नाईककडे दिली असती तर सगळे निकाल उलटे करून टाकले असते", असे विधान गणेश नाईकांनी केले.

एकनाथ शिंदेंचं नाव न घेता गणेश नाईक म्हणाले, "तुम्ही नवी मुंबईतील दुकानदाराकडे जा, कंत्राटदाराकडे जा आणि विचारा की गणेश नाईकने तुमचा चहा सोडा पाणी तरी पिला आहे का? हे जे पैसे आले आहेत, (एकनाथ शिंदेकडे) ते भ्रष्टाचाराचे पैसे आहेत. तारतम्य कोणत्या गोष्टीचे नाही. मी सांगतो की भविष्य काळात याचा शोध घेतला ना, तर यांची जागा तुरुंगात असेल. मी बोलतो आणि गांभीर्याने बोलतोय. फक्त हे आजचं मरण उद्याला गेलं आहे. पण, मरण हे निश्चित आहे."

"स्वतःच्या गळ्याभोवती फास यांनीच (एकनाथ शिंदे) बांधला आहे. कालांतराने तुम्हाला मी हे पटवून देईन. आता ती वेळ नाहीये", असे नाईक म्हणाले. युतीबद्दल बोलताना नाईकांनी सांगितले की, "नगरपरिषदेच्या निकालाचा सूर बघितल्यानंतर काही घटकांना (शिंदेसेना) समजलं की भविष्यकाळात आपण दबाव आणला नाही, तर आपले काही खरे नाही. त्यामुळे मग केंद्रीय नेतृत्वाकडे जाऊन विनवणी केली आणि केंद्रीय नेतृत्वाने सांगितलं की, युती करा. आता समजून घ्या आणि त्याची परिणीती यात झाली आहे. हे मी खुले बोलतोय मी", असा गौप्यस्फोट नाईकांनी केला.
















