Coronavirus: ‘अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाले. हे सरकार, गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का?’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 09:13 PM2020-04-14T21:13:10+5:302020-04-14T21:21:30+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला मात्र या निर्णयाने स्थलांतरित मजुरांचा आक्रोश समोर आल्याचं दिसून आलं.

मुंब्रा, वांद्रे पश्चिम या भागात हजारोंच्या संख्येने परराज्यातील कामगार रस्त्यावर आले, आम्हाला आमच्या मूळगावी जाऊ द्या अशी आग्रही मागणी जमावाकडून होऊ लागली.

इतक्या मोठ्या संख्येने जमाव पाहून परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी वेळीच लाठीचार्ज करुन तणावग्रस्त परिसर नियंत्रणात आणला. मात्र आता या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांनी या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला दोषी धरत परराज्यातील मजुरांसाठी खाण्या-राहण्याची सोय करुनही त्यांना ते नको, त्यांना आपल्या गावी जायचं आहे. यासाठी केंद्राकडे २४ तासासाठी गाड्या सुरु करण्याची विनंती केली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आरोप केला

तर बांद्य्रामध्ये हजारो मजूर रस्त्यावर उतरणे, ही अतिशय गंभीर घटना आहे. हे चित्र मनाला व्यथित करणारे आहे. परराज्यातील मजुरांची व्यवस्था करणे, त्यांना योग्य जेवण, सुविधा देणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. तशी व्यवस्था होत नसल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही निदर्शनास आणून देत आहोत. तरीही राज्य सरकारने तसे उपाय केलेले नाहीत असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

त्याचसोबत आजच्या घटनेतून तरी राज्य सरकारने धडा घ्यायला हवा आणि यापुढे असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घ्यायला हवी. अशा स्थितीतही आपली जबाबदारी झटकून केंद्र सरकारवर टीका करून पळ काढला जात असेल तर ते आणखी दुर्दैवी आहे असा घणाघातही फडणवीसांनी केला.

त्यानंतर आशिष शेलार यांनीही आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. खरंतर पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणून आपण घटनास्थळी तातडीने येण्याची गरज होती, नाहीत तर किमान खरी माहिती तरी घेणे अपेक्षित होतं. चार-पाच दिवसापूर्वी बांधकाम आणि नाका कामगार संघटनेने या परिसरात निदर्शने केली होती, ती निदर्शने सरकारने गांभीर्याने का घेतली नाहीत असा आरोप त्यांनी केला.

इतकचं नाही तर सरकारने त्यां संघटनेशी चर्चा का केली नाही? त्यांची मागणी ही रेशनींगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती. मुंबईच्या विविध भागातून आज अचानक हजारो लोक रस्त्यावर जमा झाली. हे सरकार,गुप्तचर यंत्रणा, पोलिसांचे अपयश नाही का? असा सवालही शेलारांनी उपस्थित केला.

या प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं. परराज्यातील कामगारांनी घाबरण्याचं कारण नाही, तुम्ही आमच्या राज्यात आहात आम्ही तुमची जबाबदारी घेतली आहे. त्या मजुरांना वाटलं १४ तारखेनंतर ट्रेन सुरु होतील पण तसं झालं नाही. लॉकडाऊन म्हणजे लॉकअप नाही, तुम्ही सुरक्षित आहात. ज्या दिवशी लॉकडाऊन संपेल तेव्हा आम्ही तुमच्या जाण्याची व्यवस्था करु, तुम्ही हिंमतीने भारतीय म्हणून या संकटाचा सामना करा असं आवाहन केलं.

दरम्यान, यामध्ये कोणी राजकारण करु नका, यांच्या भावनांशी खेळून कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला तर तो राज्याच्या कायद्यातून सुटणार नाही, आगीचे बंब भरपूर आहेत आग भडकवण्याचं काम करु नका. पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सगळेजण लढतायेत अशाप्रकारे इशाराही मुख्यमंत्र्यांनी समाजकंटकांना दिला.