महापालिका निवडणुकांचा 'विचित्र' पॅटर्न; तडजोडीच्या राजकारणात विरोधक एकत्र तर सत्ताधारी आमने-सामने
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 18:03 IST2025-12-31T17:51:57+5:302025-12-31T18:03:35+5:30
Municipal Election 2026: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात असा काही गोंधळ उडाला आहे की, नक्की कोणाची मैत्री कोणाशी आणि लढत कोणाविरुद्ध, हे ओळखणे आता सामान्य मतदारांच्या पलीकडचे झाले आहे. शहरागणिक समीकरणे बदलली असून, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही मोठ्या आघाड्यांचे अक्षरशः तीनतेरा वाजल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

राज्यातील राजकीय पक्षांनी सोयीचे राजकारण करताना सर्वच तत्त्वे धाब्यावर बसवली आहेत. ज्या नेत्यावर दुपारच्या सभेत एखादा नेता कडाडून टीका करतो, त्याच नेत्याचे गुणगान त्याला दुसऱ्या शहरात संध्याकाळी करावे लागत आहे. एका महापालिकेत जो पक्ष मित्र आहे, तोच शेजारच्या महापालिकेत कट्टर शत्रू बनला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असून मतदारांनी कुणाला मतदान करायचे.

मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहूजन आघाडी युतीमध्ये लढत आहेत. तर भाजप-शिंदेसेनेच्या महायुतीसमोर उद्धवसेना, मनसे, राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आव्हान असणार आहे. नवी मुंबईत भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार, रिपाइं स्वबळावर लढणार असून उद्धवेसना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस यांची आघाडी आहे.

पनवेल पालिकेत भाजप, शिंदेसेना, आरपीआय (आठवले) राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती आहे. तर शेकाप, काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी शरद पवार, मनसे, सपा आघाडी यांची आघाडी असणार आहे.

पुण्यात भाजप, रिपाइं युती असून राष्ट्रवादी अजित पवार-राष्ट्रवादी शरद पवार एकत्र लढत आहेत. तर काँग्रेस, उद्धवसेना, मनसे आघाडी असून शिंदेसेना स्वबळावर लढणार आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप रिपाइंची युती असून इथेही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत आहेत. उद्धवसेना, मनसे, रासपची आघाडी असून शिंदेसेना, काँग्रेस आणि वंचित स्वबळावर लढत आहेत.

सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत भाजप-जनसुराज्य-रिपाइंची (आठवले गट) युती आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी असून उद्धवसेना-मनसे-राष्ट्र विकास आघाडी हे एकत्र लढत आहेत. शिंदेसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढत आहे. इचलकरंजीमध्ये भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी अजित पवार यांची महायुती असून काँग्रेस मनसे-राष्ट्रवादी शरद पवार-स्वाभिमानी शेतकरी संघटना- कम्युनिस्ट पक्ष यांची शिव शाहू आघाडी तयार करण्यात आली आहे. मात्र उद्धवेसना वंचित स्वबळावर लढत आहे.

कोल्हापुरात भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादीची युती असून काँग्रेस-उद्धवसेना यांची युती आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार), वंचित आणि आप यांनी देखील युती केली आहे. सोलापुरात भाजप, एमआयएम, रिपाइं स्वबळावर लढत असून, शिंदेसेना राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झालेली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार), उद्धवसेना, माकप यांची महाआघाडी आहे.

नागपुरात भाजप-शिंदेसेना यांची युती असून काँग्रेस, बसपा, उद्धवेसना, दोन्ही राष्ट्रवादी आणि मनसे स्वबळावर लढणार आहेत. अकोल्यात भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती असून उद्धवसेना-मनसे-प्रहार यांची आघाडी पाहायला मिळणार आहे. तर शिंदेसेना स्वबळावर लढणार आहे. अमरावतीमध्ये भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी स्वबाळवर लढणार आहे. तर उद्धवेसेना-मनसे-राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी पाहायला मिळणार आहे.

जळगावात भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची महायुती असून उद्धवेसना-राष्ट्रवादी शरद पवार यांची आघाडी असणार आहे. तर काँग्रेस वंचित यांची आघाडी असणार आहे. अहिल्यानगरमध्ये भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती झाली असून उद्धवेसना-राष्ट्रवादी (शरद पवार), काँगेस यांची आघाडी असणार आहे. तर मनसे आणि शिंदेसेना स्वबळावर लढणार आहे. धुळ्यात भाजप स्वबळावर लढणार असून शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) यांची युती असली तरी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता आहे.
















