'मुख्यमंत्री' देवेंद्र फडणवीसांसमोर असतील ही ५ आव्हानं; नेतृत्वगुणांचा कस लागणार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 16:29 IST2024-12-05T15:39:04+5:302024-12-05T16:29:46+5:30
Devendra Fadnavis Oath Taking Ceremony: बरंच विचारमंथन झाल्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र हे सरकार चालवण्यापासून ते राज्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय आव्हानांचा डोंगर समोर असल्याने मुख्यमंत्रिपद हे देवेंद्र फणडवीस यांच्यासाठी काटेरी मुकुट ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असलेल्या पाच प्रमुख आव्हानांचा आपण आढावा घेऊयात.

भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीय यश आणि भाजपाला आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांनी आखलेली रणनीती महत्त्वपूर्ण ठरली होती. या विजयानंतर बरंच विचारमंथन झाल्यावर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. मात्र हे सरकार चालवण्यापासून ते राज्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय आव्हानांचा डोंगर समोर असल्याने मुख्यमंत्रिपद हे देवेंद्र फणडवीस यांच्यासाठी काटेरी मुकुट ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असलेल्या पाच प्रमुख आव्हानांचा आपण आढावा घेऊयात.
मित्रपक्षांना सांभाळून सरकार चालवण्याची कसरत
या विधानसभा निवडणुकीत एकट्या भाजपाला १३२ जागा मिळाल्या आहेत. तसेच मित्र पक्षांच्या पाठिंब्यामुळे भाजपाचं संख्याबळ १३७ पर्यंत पोहोचललेलं आहे. अशा परिस्थितीत भाजपाला मित्रपक्षांच्या दबावात वावरण्याची फारशी आवश्यकता नाही. मात्र महायुतीला मिळालेल्या विजयात शिवसेना शिंदे गट, आणि अजित पवार यांची साथ आणि एकनाथ शिंदे यांचं नेतृत्वही महत्त्वाचं ठरलं होतं. त्यामुळे हे सरकार चालवताना देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही विचारात घ्यावं लागणार आहे. त्यातच सरकारचा शपथविधी होण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुरू असलेली जुगलबंदी, नाराजीनाट्य यामुळे या मित्रपक्षांची मर्जी सांभाळताना देवेंद्र फडणवीस यांच्या नाकी नऊ येण्याची शक्यता आहे.
गुजरातधार्जिणं सरकार ही प्रतिमा बदलण्याचं आव्हान
मागच्या काही काळात महाराष्ट्राच्या राजकारणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा होत असलेला हस्तक्षेप, महाराष्ट्रातून विविध प्रकल्प गुजरातला पळवण्यात आल्याचा विरोधकांकडून होत असलेला आरोप आणि अदानींकडे दिलेले धारावीसह मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्प यामुळे राज्यातील भाजपा आणि भाजपाच्या नेतृत्वातील सरकार हे गुजरात धार्जिणं असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. आता पुढच्या काळातही अशा प्रकारचे आरोप होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हे आरोप यशस्वीपणे परतवून लावण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आहे.
मराठा आरक्षण आणि जातीपातीचं राजकारण
देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्रिपदासाठी नाव समोर आणण्यात आल्यानंतर काही विरोधकांनी त्यांना जातीवरून लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे हे मराठा समाजातील असल्याने त्यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यावरून जातीचं कार्ड खेळलं जाऊ शकतं. त्यातच मागच्या वर्षभरापासून मराठा आरक्षण आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना सातत्याने लक्ष्य केलेलं आहे. त्यात आता सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आरक्षणासाठी उपोषणाला बसण्याचाही इशारा दिला आहे. अशा परिस्थितीत मराठा आरक्षण आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या बंपर विजयामुळे राज्यातील सत्तेत महायुतीचं सरकार हे भक्कमपणे बसलेलं आहे. मात्र हे यश हा केवळ योगायोग किंवा तात्कालिक जनादेश नव्हता तर राज्यातील मतदार आपल्या पाठीशी कायम आहे, हे दाखवून देण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल. त्या दृष्टीने काही काळाने होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. त्यातही मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आदी महानगरपालिकांवर राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष राहणार आहे.