स्वप्नात शिवरायांचा दृष्टांत झाला म्हणून बारामती लोकसभा लढवणार, 'हा' उमेदवार कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 10:06 PM2024-04-03T22:06:56+5:302024-04-03T22:10:47+5:30

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सगळेच पक्ष तयारीला लागलेत. त्यात बारामती मतदारसंघातील लढाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्याचं कारण म्हणजे या मतदारसंघात पवारविरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार तर शरद पवारांची लेक सुप्रिया सुळे आमनेसामने आले आहेत.

बारामती मतदारसंघात काही दिवसांपूर्वी पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. पवारांविरोधात आक्रमक टीका करत शिवतारेंनी निवडणूकच लढवणारच असा चंग बांधला. मात्र काही दिवसांनीच विजय शिवतारे यांचे बंड थंड करण्यात महायुतीला यश आले. त्यामुळे शिवतारेंनी माघार घेत महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं सांगितलं.

बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होईल असं बोललं जातं. परंतु आता या निवडणुकीत नामदेव जाधव उतरणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नात दृष्टांत दिल्याचा दावा जाधवांनी केला असून नियतीने मला राजकारणात आणलं असं त्यांनी म्हटलं आहे.

नामदेव जाधव म्हणतात की, शिवतारेंनी माघार घेतल्यानंतर मला अनेकांचे मेसेज आले. तुम्ही पुरंदरचे आहात, तुमचे आजोळ बारामतीचं आहे. मग तुम्ही पुढाकार का घेत नाही? मी विचार करायला सुरुवात केली. शहाजीराजेंच्या मूळ जहागिरीचा हा प्रदेश आहे.

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं केंद्रबिदू असलेला हा मतदारसंघ आहे. ज्या रायरेश्वर मंदिरात शिवरायांनी शपथ घेतली ते इथेच आहे. पहिला तोरणा किल्ला जिंकला तो इथेच, राजगड किल्ला हा इथेच आहे. पुरंदरचा तह इथेच झाला. सिंहगड किल्लाही इथेच आहे. एवढे असूनही किल्ल्यांचा विकास झाला नाही.

त्याबाबत विचार करत असताना मला दृष्टांत झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी संकेत दिले तुम्ही त्या गावचे मग तुम्ही पुढाकार का घेत नाही. मी जी गोष्ट टाळत होतो पण नियती मला त्याबाजूला का ढकलतेय असा विचार करायला सुरुवात केली तेव्हा ही सगळी इतिहासाची समीकरणे मला दिसली.

ज्या माणसाचं आपण आयुष्यभर चिंतन करतो, त्यांनी दृष्टांत दिला, त्याचे संकेत काय आहे, पहाटे ४ वाजता हा दृष्टांत झाला. मला यातून जाणवलं की या मतदारसंघात असलेल्या ४ किल्ल्यांकडे जाणारा चार पदरी हायवे तयार केले आणि प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी ४ हेलिपॅड, ४ रोपवे एवढे केले तरी मतदारसंघातील ४ लाख तरुणांना रोजगार मिळेल. म्हणजे ४ लाख कुटुंबांना रोजगार मिळेल. एवढे शिवाजी महाराजांनी ४५० वर्षापूर्वी तयार केले आहे असंही जाधव यांनी सांगितले.

शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा, वसा पुढे नेण्याचे संकेत मिळाले म्हणून मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. शिवाजी महाराजांच्या विचारांवर कुठला पक्ष चाललाय हे दिसत नाही. कोण कुठल्या पक्षात आहेत हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे शिवाजी महाराजांचे स्वप्न, ध्येर्य पूर्ण करण्यासाठी नियतीने मला संधी दिली आहे असं नामदेव जाधव यांनी म्हटलं.

कोण आहेत नामदेव जाधव? छत्रपती शिवाजी महाराजांवर शिवाजी द मॅनजमेंट गुरु नावाचं पुस्तक लिहिल्यानंतर नामदेव जाधव चर्चेत आले. लेखक, प्रेरणादायी भाषण देणारे वक्ते अशी त्यांची ओळख आहे. त्याचसोबत नामदेव जाधव हे स्वत:ला जिजाऊ यांचे वंशज मानतात.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेले नामदेव जाधव यांनी शरद पवारांवर जहरी टीका केली होती. पवारांमुळेच मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही असा दावा करत त्यांनी पवार ओबीसी आहेत असंही म्हटलं होते. त्यानंतर राष्ट्रवादी पवार समर्थक कार्यकर्त्यांकडून पुण्यात नामदेव जाधवांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न झाला होता.