मुंबईत अमित शाह यांची हाय व्होल्टेज बैठक: सत्ता आणण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना दिले ७ कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 12:57 IST2024-09-09T12:47:20+5:302024-09-09T12:57:55+5:30
अमित शाह यांनी नेत्यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबतचा कानमंत्र दिला आहे.

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला बसलेला धक्का आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर काल अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत महायुतीच्या नेत्यांची बैठक पार पडली.
महायुतीच्या नेत्यांसोबत खलबते केल्यानंतर अमित शाह यांनी राज्यातील भाजप नेत्यांसोबतही तब्बल २ तास स्वतंत्र चर्चा केली.
या दोन्ही बैठकांमध्ये अमित शाह यांनी नेत्यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबतचा कानमंत्र दिला आहे.
१. जाहीर वाद टाळा: महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटप आणि इतर काही मुद्द्यांवरून जाहीर व्यासपीठांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यामुळे जनतेत वेगळा संदेश जात असल्याने जाहीरपणे वाद घालणं टाळा, अशा सूचना अमित शाह यांनी दिल्या आहेत.
२. लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरी टाळण्यासाठी त्या निवडणुकीत झालेल्या चुका टाळा, असंही शाह यांच्याकडून नेत्यांना सांगण्यात आलं आहे.
३. तिकीटवापट: महायुतीत जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरताना दिसत आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीवर मात करायची असेल तर योग्य उमेदवारांनाच तिकीट द्या, अशीही सूचना अमित शाह यांच्याकडून करण्यात आली आहे.
४. नरेटिव्हला उत्तर: लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी पसरवलेल्या नरेटिव्हमुळे आमचा पराभव झाला असल्याचं वारंवार भाजप नेत्यांकडून सांगण्यात येतं. त्यामुळे विरोधकांच्या अशा नरेटिव्हला वेळीच जशास तसं उत्तर द्या, असं शाह यांनी आपल्या नेत्यांना सांगितलं आहे.
५. महायुतीच्या नेत्यांनी संयम ठेवत एकजूट दिसेल, असं वर्तन करण्याची सूचनाही शाह यांनी दिली आहे.
६. महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवल्यास त्याचा सकारात्मक परिणाम होईल, असं मत अमित शाह यांनी बैठकीत मांडलं आहे.
७. काही विद्यमान आमदारांना धक्का?- ज्या आमदारांची कामगिरी समाधानकारक नाही, त्यांच्या तिकीटवाटपाबाबत योग्य निर्णय घेण्याचा सल्लाही अमित शाह यांनी राज्यातील भाजप नेत्यांना दिला आहे.