Union Budget 2026: काय असतो बजेटचा Part B ?; ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच बदलणार प्रथा, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 11:13 IST2026-02-01T11:01:06+5:302026-02-01T11:13:42+5:30

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १ फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर करत आहेत. देशाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वजण लक्ष ठेवून असतात. अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन या सलग ९ व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. जो एकप्रकारे नवा रेकॉर्ड आहे.

२०२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प काही खास होणार आहे. विशेषत: अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलणार आहे. यावर्षीचे अर्थसंकल्प सादरीकरण हे मागील ७५ वर्षांत आतापर्यंत आलेल्या सर्व अर्थसंकल्पापेक्षा अनोखे असणार आहे.

काय असणार खास?- सामान्यत: अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट A मध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली असते. तर पार्ट B मध्ये केवळ घोषणाच असतात. सरकारी सूत्रांनुसार, यावर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन पार्ट B सविस्तरपणे सांगण्याची अपेक्षा आहे.

अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट B मध्ये अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टांवर भर दिला जाईल. या घोषणांचे तपशीलवार वर्णन केले जाईल. पार्ट B मध्ये भारताचे आर्थिक दृष्टिकोन आणि प्राधान्यक्रम मांडले जातील.

पार्ट B मध्ये आणखी काय समाविष्ट असेल? - याव्यतिरिक्त पार्ट B मध्ये भारताच्या क्षमता आणि त्या जगासमोर सादर करण्यासाठीचा रोडमॅप देखील अधोरेखित केला जाऊ शकतो. याचा अर्थ तो देशाच्या विकासाच्या भविष्यातील शक्यता दर्शवणार आहे.

म्हणूनच यावर्षी अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट B कडे भारत आणि जगभरातील अर्थशास्त्रज्ञ, तज्ञांकडून लक्षणीय लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे. तुम्ही संसद टीव्ही, प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) इंडियाच्या YouTube चॅनेल आणि सरकारी वेबसाइट, indiabudget.gov.in वर बजेटचे थेट प्रक्षेपण पाहू शकता.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२० च्या केंद्रीय अर्थसंकल्पात केलेलं भाषण हे भारतीय इतिहासातील सर्वात मोठं अर्थसंकल्पीय भाषण होतं. अर्थमंत्री झाल्यानंतर सीतारमण यांचं हे दुसरे अर्थसंकल्पीय भाषण होते. ते १ फेब्रुवारी २०२० रोजी सादर करण्यात आले.

हे भाषण सकाळी ११ वाजता सुरू झाले आणि दुपारी १:४० वाजेपर्यंत चाललं, एकूण २ तास ४२ मिनिटे त्यांनी भाषण केलं. भाषण इतकं लांब होतं की, दोन पाने शिल्लक असतानाच अर्थमंत्री आजारी पडल्या. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी उर्वरित भाषण पूर्ण केलं.