Birthday Special : ‘हा’ सिनेमा ठरला होता सलीम खान व अमिताभ यांच्यातील दुराव्याचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 12:44 PM2020-11-24T12:44:46+5:302020-11-24T12:56:26+5:30

सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा आज वाढदिवस.

सलमान खानचे वडील आणि प्रसिद्ध लेखक सलीम खान यांचा आज वाढदिवस. सलीम-जावेद या जोडीने भारतीय सिनेमाला दिवार, जंजीर, शोले, शान, शक्ती यासारखे क्लासिक सिनेमे दिलेत. या सिनेमांचे संवाद आणि त्याच्या कथेचे कौतुक आजही होते.

फार कमी लोकांना ठाऊक असेल की, सलीम खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. सलीम खान यांनी एक अभिनेता म्हणूनच त्यांच्या कारकिदीर्ची सुरुवात केली होती. त्यांनी ‘भारत’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

पहिल्या चित्रपटाला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी दिवाना, तिसरी मंजिल यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. पण एक अभिनेता म्हणून त्यांना त्यांची ओळख मिळवता आली नाही. सलीम खान हे मुळचे इंदौरचे असून ते केवळ कामासाठी मुंबईत आले होते. चित्रपटात अपयश मिळाल्यानंतर पुन्हा इंदौरला जाणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी चित्रपटांचे लेखन करायला सुरुवात केली.

सलीम-जावेद यांच्या जोडीने अनेक हिट सिनेमे दिलेत. त्याकाळी या जोडीचा असा काही दबदबा होता की, ही जोडी हिरोपेक्षाही अधिक मानधन घ्यायची. मग ही जोडी कशी तुटली तर यामागे अमिताभ बच्चनमुळे.

होय, सलीम-जावेद या जोडीने अमिताभ यांना ‘अँग्रीमॅन’ ही ओळख दिली. याच अमिताभ यांनी नकार दिला आणि सलीम खान दुखावले गेलेत. ‘मिस्टर इंडिया’ या सिनेमात सलीम व जावेद अमिताभ यांना घेऊ इच्छित होते. पण अमिताभ यांनी कथा ऐकण्याआधीच केवळ चित्रपटाची आयडिया ऐकून चित्रपटाला नकार दिला. यामुळे सलीम कुठेतरी दुखावले गेलेत. यानंतर अमिताभ बच्चन यांच्यासोबत कधीच काम न करण्याचे त्यांनी ठरवले.

सलीम यांनी ही गोष्ट जावेद यांनाही सांगितली. यानंतर अमिताभसाठी कथा लिहायची नाही, असे एकमतही झाले. मात्र यानंतर काय बिनसले कोणास ठाऊक ‘मिस्टर इंडिया’नंतर सलीम-अमिताभच नाही तर सलीम-जावेद ही जोडीही तुटली.

नीलेश मिश्राचा चॅट शो ‘स्लो इंटरव्ह्यू’मध्ये सलीम खान यावर बोलले होते. त्यांनी सांगितले होते की, एकदिवस जावेद आले आणि त्यांनी मला वेगळे व्हायचेय, असे सांगितले. त्यांचे ते शब्द ऐकून मला धक्का बसला. आमच्या विभक्त होण्याचे कारण अपयश, पैसा असते तर फार काही वाटले नसते. पण असेच अगदी अचानक चल, आता आपण वेगळे होऊ, असा विचार करणे प्रचंड वेदनादायी होते.’

‘आमची जोडी उभी करण्यासाठी मी खूप वेळ दिला होता. आमच्या जोडीचे इंडस्ट्रीत एक नाव होते. एक वेगळा दबदबा होता. आमच्या नावावर चांगले पैसे मिळायचे. पण हे सगळे काही सेकंदात संपुष्टात आले. आमचे शेवटचे काही चित्रपट फ्लॉप होऊ लागले होते. पण यावरून आमच्यात कधीच वाद झाला नाही. पण आता मी या सगळ्यांतून बाहेर आलो आहे,’असेही त्यांनी सांगितले.

जावेद यांच्यापासून दुरावल्यानंतर सलीम खान यांनी 10 सिनेमांच्या पटकथा लिहिल्या. पण जावेद यांच्यासोबतची जोडी तुटल्याने त्यांचे मन फार काळ रमले नाही.