५ राशींवर गणपती बाप्पाची कायम कृपा, अपार बुद्धी, कालातीत लाभ; भरघोस भरभराट, भाग्योदय होतो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:27 IST2025-08-25T16:14:15+5:302025-08-25T16:27:00+5:30
Ganesh Chaturthi 2025 Ganpati Priya Rashi: काही राशींवर गणपतीची कायम कृपा असते, असे मानतात. आर्थिक आघाडी, करिअर यामध्ये गणपतीच्या शुभाशिर्वादामुळे यश-प्रगती मिळते, भरभराट होऊ शकते, असे सांगितले जाते. तुमची रास आहे का यात?

गणपती हा प्रथमेश आणि विघ्नहर्ता आहे. २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी आहे. यानंतर पुढे गणेशोत्सव सुरू राहणार आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते. गणपतीची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभ आणि मंगल कार्य पूर्ण होत नाही.
गणपतीची योग्य प्रकारे पूजा केल्याने शुभ फळे मिळतात. बिघडलेले काम पूर्ण होऊ लागते. ज्योतिषशास्त्रानुसार, १२ राशी कोणत्या ना कोणत्या देवतेशी संबंधित आहेत. त्याचप्रमाणे, काही राशी अशा आहेत ज्यांवर गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो. गणपतीसोबतच या राशींना रिद्धी-सिद्धीचाही आशीर्वाद लाभतो.
यंदाची गणेश चतुर्थी अनेकार्थाने महत्त्वाची मानली जात आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, अनेक दुर्मिळ शुभ योगात या गणेशोत्सवाची सुरुवात होत आहे. यावेळी गणेश चतुर्थीला दुर्लभ योग जुळून येत आहेत. यामध्ये सर्वार्थ सिद्धी योग, रवि योग, प्रीति योग, इंद्र योग आणि ब्रह्म योग यांचा समावेश आहे. तसेच महालक्ष्मी योग, महाभाग्य योग, लक्ष्मी नारायण योगही जुळून येत आहेत. या प्रिय राशींनी काही उपाय केल्यास आणखी पुण्य प्राप्त होऊ शकते, असे म्हटले जाते.
मेष: या राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. या राशीच्या लोकांना गणपती बाप्पाचा विशेष आशीर्वाद असतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या परिश्रमाचे फळ निश्चितच मिळू शकते. नशिबाची, भाग्याची साथ लाभते. पैशाची कमतरता कधीच नसते. नेहमीच सुख-समृद्धी लाभते. करिअरपासून ते व्यवसायापर्यंत भरपूर नफा मिळू शकतो. छोट्याशा प्रयत्नांनी ते मोठे यश मिळवतात. विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी या राशीच्या लोकांनी गणपतीला मोदक अर्पण करावेत.
मिथुन: या राशीचा स्वामी बुध आहे. भगवान गणेशाला या ग्रहाचा अधिपती मानले जाते. कारण गणपती बुद्धी आणि विवेकाची देवता मानली जाते. या राशीच्या लोकांना गणेशाचे विशेष आशीर्वाद मिळतात. या राशीच्या लोकांना खूप प्रगती आणि संपत्ती मिळू शकते. गणपती प्रत्येक संकट दूर करण्यास मदत करतो, रक्षण करतो. समाजात आदर आणि मान-सन्मान वाढतो. गणेशाचे विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण करावी.
कन्या: कन्या राशीचा स्वामी बुध ग्रहच आहे. या राशीच्या लोकांना गणपतीचा विशेष आशीर्वाद असतो. बाप्पा या राशीच्या लोकांना कधीही आर्थिक संकटाचा सामना किंवा पैशांची चणचण होऊ भासू देत नाही. यामुळे जीवनात सुरू असलेली प्रत्येक समस्या संपू शकते. प्रत्येक कामात यश मिळते. अनेक इच्छा पूर्ण होतात. आर्थिक स्थिती चांगली राहते. शिक्षण क्षेत्रात खूप फायदा होतो. गणेश चतुर्थीच्या वेळी या राशीच्या लोकांनी गोड फळे दुर्वा किंवा हिरव्या वस्तू अर्पण कराव्यात.
वृश्चिक: या राशीचा स्वामी मंगळ आहे. गणपती बाप्पा या राशीच्या लोकांवर दयाळू असतात. या राशीचे लोक स्वभावाने थोडे आक्रमक असतात. गणपतीमुळे या राशीच्या लोकांचे बिघडलेले काम योग्य मार्गाला लागू शकते. विघ्नहर्ता सर्व त्रास दूर करतो. गणपतीचे विशेष आशीर्वाद मिळविण्यासाठी गणेश चतुर्थीला मोतीचूर लाडू अर्पण करावेत.
मीन: मीन राशीचा स्वामी गुरु ग्रह आहे. ही गणपतीची प्रिय रास असल्याचे म्हटले जाते. गणेशाची आध्यात्मिक ऊर्जा विशेषतः मीन राशीशी जोडलेली असते, असे सांगितले जाते. मीन राशीचे लोक गणेशाची पूजा करून वाईट ग्रहांचे दुष्परिणाम कमी करू शकतात. गणपतीच्या आशीर्वादाने ध्यान आणि अध्यात्म वाढते. मीन राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीचे व्रत ठेवावे. ॐ एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात् ॥ या गणेश गायत्री मंत्राचा जप करावा. हा उपाय केल्याने विविध प्रकारचे लाभ, फायदे मिळू शकतील.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.