Ganesh Chaturthi 2022: गणेशोत्सव: गणेश चतुर्थीला बाप्पाची स्थापना कशी करावी? ‘या’ गोष्टी नक्कीच करा, कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:30 AM2022-08-28T10:30:40+5:302022-08-28T10:30:40+5:30

Ganesh Chaturthi 2022: गणेश चतुर्थीला बाप्पाची मूर्ती कशी असावी? घरी स्थापना करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? जाणून घ्या...

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कला अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन भाद्रपद महिन्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाचे केवळ नाव उच्चारताच मन अगदी चैतन्यमय होऊन जाते. यंदा ३१ ऑगस्ट २०२२ रोजी गणेश चतुर्थी आहे. (Ganesh Chaturthi 2022)

गणेश चतुर्थीची सुरुवात श्रीगणेशाच्या प्रतिष्ठापनेने होते. पहिल्या दिवशी लोक आपल्या घरी गणपतीची स्थापना करतात. असे म्हटले जाते की, या दिवशी गणपतीची पूजा केल्याने माणसाच्या सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात. गणेश चतुर्थीच्या आधी वास्तूनुसार गणपतीची मूर्ती कशी असावी, हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकेल.

गणेशमूर्ती घरी आणताना बाप्पाच्या मुद्रेकडे लक्ष द्यायला विसरू नका. ललितासनातील गणेशमूर्ती सर्वोत्तम मानली जाते. अशी गणेशाची मूर्ती शांततेचे प्रतिक मानली जाते. अशा प्रकारच्या मूर्तीमुळे कुटुंबात शांतता राहते. याशिवाय गणपती बाप्पाचे विश्राम स्थितीतील गणेशाचे चित्र खूप भाग्यकारक मानले जाते. कारण ते विलास, आराम आणि संपत्तीचे प्रतिनिधित्व करते, असे म्हटले जाते.

आपल्या घरासाठी गणपतीची मूर्ती किंवा मूर्ती निवडताना गणेशाच्या सोंडेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रानुसार, गणेशमूर्तीची सोंड डावीकडे कललेली असावी, कारण ती यश आणि समृद्धीची दिशा मानली जाते. असे मानले जाते की, श्रीगणेशाची सोंड उजवीकडे असेल, तर त्याला प्रसन्न करणे कठीण जाऊ शकते.

घरासाठी गणपतीची मूर्ती खरेदी करताना मोदक आणि उंदीरही मूर्तीचा एक भाग असल्याची खात्री करा. कारण उंदीर हे त्यांचे वाहन मानले जाते तर मोदक हा त्यांचा आवडता गोड पदार्थ मानला जातो. त्यामुळे गणेशमूर्ती निवडताना या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी.

वास्तुशास्त्रानुसार, ज्यांना शांतता आणि समृद्धी हवी आहे त्यांच्यासाठी घरासाठी पांढर्‍या रंगाची गणेशमूर्ती योग्य पर्याय आहे. तुम्ही पांढर्‍या गणेशाच्या रंगीत प्रतिमा देखील निवडू शकता. ज्यांना आत्मविकासाची इच्छा आहे त्यांनी घरासाठी सिंदूर रंगाची गणेशमूर्ती निवडावी. शुभ्र रंगाची मूर्ती गणेश संपत्ती, आनंद आणि समृद्धी आकर्षित करतो, असे मानले जाते.

वास्तु तज्ज्ञांच्या मते श्रीगणेशाची मूर्ती पूर्व-पश्चिम, उत्तर आणि ईशान्य दिशेला स्थापित करणे चांगले मानले जाते. घरात ठेवलेल्या गणेशजींची सर्व तसबिरी किंवा प्रतिमा उत्तरेस असावीत, असे सांगितले जाते. कारण या दिशेला बाप्पाचे बाबा महादेव शिवशंकर राहतात, असे मानले जाते. जर तुम्ही घरामध्ये गणपतीची मूर्ती ठेवत असाल तर ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे तोंड करून असावी. गणेशाची मूर्ती दक्षिण दिशेला ठेवू नये.

वास्तु तज्ज्ञांच्या मते गणेशमूर्ती बेडरूम, गॅरेज किंवा लॉन्ड्रीमध्ये ठेवू नये. तसेच ते पायऱ्यांखाली किंवा बाथरूमजवळ ठेवू नये. गॅरेज किंवा कार पार्किंगची जागा रिकामी जागा मानली जात असल्याने घराच्या या भागात देवता बसवणे अशुभ आहे. तसेच, पायऱ्यांखाली अनेक नकारात्मक ऊर्जा असतात जी कोणतीही वास्तू ठेवण्यास योग्य नाहीत.

कोरोनाच्या संकटानंतर विघ्नहर्ता गणरायाच्या आगमनाची मोठ्या प्रमाणात धूम पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. यंदाचा गणेशोत्सवाचा आनंद निराळाच असल्याचे म्हटले जात आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, प्रत्येकाने आपले कुळधर्म आणि कुळाचाराप्रमाणे करावे, असे सांगितले जात आहे.