परभणीत भाजपचे नाराज पक्ष सोडत असताना शिंदेसेनेने दिला ५०-५० चा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:45 IST2025-12-27T15:40:41+5:302025-12-27T15:45:02+5:30
भाजपच्याच काहींनी नाराजीमुळे दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

परभणीत भाजपचे नाराज पक्ष सोडत असताना शिंदेसेनेने दिला ५०-५० चा प्रस्ताव
परभणी : महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळ आजमावणार हे आधीच स्पष्ट होते. मात्र भाजप व शिंदेसेनेचेही सूर जुळतील, असे वाटत नाही. शिंदेसेनेचा ५०-५० चा जागावाटपाचा फॉर्म्युला भाजपला मान्य होणेच शक्य नाही. दुसरीकडे, भाजपच्याच काहींनी नाराजीमुळे दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. खुद्द माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा पुतण्याच नाराज झाल्याने त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
परभणीत भाजपने सत्ता खेचून आणायचीच, असा चंग बांधल्याने मागच्या अनुभवी माजी आमदार सुरेश वरपूडकरांना पक्षात घेतले. मात्र त्यांच्या हातात पूर्ण कारभार दिला नाही. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचेच वर्चस्व दिसत आहे. शिवाय महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी प्रभागनिहाय इच्छुकांची चाचपणी करून आधीच जास्तीत जास्त प्रभागात उमेदवार कसे देता येतील, हे पाहिले. त्यानंतर पुन्हा काही नव्या इच्छुकांची भर पडली. त्यामुळे हिंदुबहुल प्रभागांमध्ये भाजपकडे असलेली गर्दी अडचणीची ठरू लागली. त्यात शिंदेसेनेने ५० टक्के जागांचा आग्रह धरला. त्यामुळे ही बोलणी फिसकटण्याचीच चिन्हे आहेत.
मागील काही दिवस नाराज दिसत असलेले प्रथम महापौर प्रताप देशमुख अखेर सक्रिय झाले आहेत. आमदार राजेश विटेकर यांच्यासमवेत बैठका घेऊन रणनीती आखताना दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आता ताकद लावताना दिसत आहे.
आघाडीतही बिघाडीचेच संकेत
काँग्रेसनेही आधी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पक्षांतरानंतरही उरलेल्या माजी नगरसेवकांना प्राधान्य दिले जात आहे. शिवाय आघाडीचे गणित जुळत नसल्याने या माजी नगरसेवकांनी आपल्यासोबत कुणाला घ्यायचे ते आधीच निश्चित केले. आता उद्धवसेनेशी युती करायची तर यांचे काय करायचे? हा प्रश्न आहे. उद्धवसेनेने जागावाटपाचा प्रस्तावही दिलेला नाही. जेथे ज्याचा सक्षम उमेदवार तेथे त्याला उमेदवारी हे सूत्र असावे, असे म्हटले जात आहे. मात्र या सक्षमतेचे निकष कोण ठरविणार?
भाजपमधील गर्दीने गोची
भाजपमध्ये जुन्या व नव्यांची सांगड घालणे अवघड जात आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये नंतर गेले. त्यांचे बंधू विजय वरपूडकर आधीच तेथे होते. मात्र भाजपकडून विजय वरपूडकर यांचा मुलगा टोनी यांचीच उमेदवारी निश्चित होत नसल्याने ते राष्ट्रवादीच्या संपर्कात दिसत आहेत. वरपूडकर समर्थक विश्वजित बुधवंत यांच्या प्रवेशानंतर तेथील एका जुन्या भाजप निष्ठावंताने थेट प्रदेशकडून उमेदवारीसाठी दबाव आणला. त्यामुळे ही उमेदवारीही पेचात आहे.
उद्धवसेनेचा युवा जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीत
उद्धवसेनेचे जागावाटप व आघाडीचे भिजत घोंगडे कायम असल्याने यात आपले काही खरे दिसत नसल्याचे पाहून उद्धवसेना युवा जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले यांनी थेट राष्ट्रवादी (अजित पवार)च्या गोटात जाणे पसंत केले. तेथे यापूर्वीच्या सभागृहात राहिलेल्या अनुभवी चेहऱ्यांसोबत लढण्याची संधी घेण्याचा प्रयत्न आहे.