परभणीला दत्तक घेऊन धूळमुक्त, खड्डेमुक्त करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 18:52 IST2026-01-09T18:52:05+5:302026-01-09T18:52:27+5:30
दर्गा परिसर ते पारदेश्वर मंदिर; परभणीच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणार

परभणीला दत्तक घेऊन धूळमुक्त, खड्डेमुक्त करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शब्द
परभणी: शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असून, शहराच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी ठोस निर्णय घेतले जातील, असा ठाम शब्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला. परभणी शहर मी दत्तक घेण्यास तयार आहे; मात्र त्यासाठी महापालिकेवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची सत्ता आणा, असे आवाहनही त्यांनी केले.
राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार फौजिया खान, माजी आमदार विजय गव्हाणे, आमदार राजेश विटेकर, माजी आमदार विजय भांबळे, माजी महापौर प्रताप देशमुख, अक्षय देशमुख यांच्यासह पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, बाहेरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी पाथरी रोड–असोला बायपासप्रमाणेच असोला ते कृषी विद्यापीठ मार्गे ब्राह्मणगाव आणि ब्राह्मणगाव ते पाथरी रोड असे दोन नवीन बायपास उभारण्याबाबत राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिकेच्या हद्दीतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागांवर बीओटी तत्त्वावर व्यावसायिक कॉम्प्लेक्स उभारून महापालिकेला कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन निर्माण करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करण्यात येतील. तसेच गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या वतीने सीबीएसई अभ्यासक्रमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच परभणी शहराची ओळख धुळीचे व खड्ड्यांचे शहर अशी होऊ नये, यासाठी धूळमुक्त, खड्डेमुक्त, स्वच्छ व सुंदर शहर बनवण्यावर स्वतः लक्ष घालणार असून, परभणीकरांना अभिमान वाटेल असे शहर उभारण्याचा शब्द त्यांनी दिला.
दर्गा परिसर ते पारदेश्वर मंदिर; परभणीच्या धार्मिक पर्यटनाला चालना देणार
आरोग्य सुविधांच्या दृष्टीने परभणी शहरात महापालिकेचे स्वतःचे मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात येईल. शहरातील रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी ४०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, प्रत्यक्ष काम लवकरच सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच अल्पसंख्याक खात्याच्या माध्यमातून सय्यद तुराबुल हक्क साहेब दर्गा परिसराचा विशेष विकास आराखडा तयार करण्यात येणार असून, निवडणुका संपल्यानंतर विशेष अधिकारी परभणीत येऊन दोन दिवस मुक्काम करून आराखडा तयार करतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच संपूर्ण जगात एकमेव असलेले अडीच क्विंटल पाऱ्याचे शिवलिंग असलेल्या पारदेश्वर मंदिराचा धार्मिक व पर्यटन विकास करण्यासाठी विशेष आराखडा तयार करण्याबाबत तेथील महंतांशी चर्चा केली जाणार असल्याचेही पवार म्हणाले.