काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 16:04 IST2025-12-30T16:04:38+5:302025-12-30T16:04:38+5:30
आगामा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आहे.

काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार
परभणी : राज्यात दोन राष्ट्रवादी महापालिका निवडणुका एकत्र लढणार असून परभणीतही त्यावर अंमल झाला. दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येत केलेल्या आघाडीत अजित पवार गटाचे ५७ तर शरद पवार गटाचे ८ उमेदवार लढणार आहेत. सगळ्यात शेवटी ज्यांनी बोलणी सुरू केली, त्यांनी आघाडी करण्यातही आघाडी घेतली.
परभणी महापालिकेत मागच्या पाच वर्षांत दुसऱ्या क्रमांकावर असलेली राष्ट्रवादी त्यापूर्वी सलग दहा वर्षे पालिका असल्यापासून सत्तेत होती. त्यामुळे उमेदवारांची गर्दी असतानाही त्यावर मात करून राष्ट्रवादीने सर्व जागांवर उमेदवार देण्याची तयारी केली होती. त्यातच वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोबत घेण्याचाही ऐनवेळी निर्णय झाला.
त्यानंतर राष्ट्रवादी (अजित पवार)चे आ.राजेश विटेकर, माजी महापौर प्रताप देशमुख, अक्षय देशमुख आदींनी राष्ट्रवादी (शरद पवार)च्या खा. फौजिया खान, माजी आ.विजय गव्हाणे, अजय गव्हाणे आदींशी चर्चा करून जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरविला. त्यावर अंमलही केला. शरद पवार गटाला प्रभाग क्रमांक १ व ९ मध्ये सर्वच जागा देवून टाकल्या. त्यामुळे या ८ जागांवर त्यांनी समाधान मानले. तर राष्ट्रवादी (अजित पवार)च्या उर्वरित ५७ जागांवरील उमेदवारांची यादीही जाहीर केली.
याबाबत महानगराध्यक्ष प्रताप देशमुख म्हणाले, राष्ट्रवादीने आघाडीत सर्व ६५ जागांवर उमेदवार दिले आहेत. पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवू. राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकदिलाने व एकजीवाने लढणार असल्याने त्याचा नक्कीच फायदा होईल.