परभणीत युती, आघाडीवर शिक्कामोर्तब; उमेदवारांच्या याद्या गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:10 IST2025-12-30T13:10:02+5:302025-12-30T13:10:12+5:30

जागा निष्ठावंतांसाठी हव्यात की सभागृहात डोकी वाढविण्यासाठी?

Parbhani Municipal corporation Election 2026 Alliance in Parbhani; But lists of candidates in not disclosed | परभणीत युती, आघाडीवर शिक्कामोर्तब; उमेदवारांच्या याद्या गुलदस्त्यात

परभणीत युती, आघाडीवर शिक्कामोर्तब; उमेदवारांच्या याद्या गुलदस्त्यात

परभणी: परभणीत युती व आघाडी झाल्याचे नेतेमंडळी सांगत आहे. मात्र अजून उमेदवारांच्या याद्या अंतिम होत नसल्याचे चित्र आहे. ऐनवेळी जागेची तडजोड करताना मित्रपक्षाला उमेदवारच देण्याचा फंडा करण्यात येत असल्याने जागावाटपाचा हा खेळ सभागृहातील डोकी वाढविण्यासाठी निष्ठावंतांसाठी हा प्रश्नच आहे. 

परभणी महापालिकेत मागच्या सभागृहात काँग्रेस ३१, राष्ट्रवादी १९, भाजप ८, शिवसेना ५, एमआयएम १, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देण्यास सगळेच उत्सुक असल्याने त्यांनी एकहाती सत्ता गाजविली. आता त्यांची सत्ता हिसकावण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाने जोर लावला आहे. तर त्यांच्यावर कुरघोडीसाठी भाजप व शिंदेसेना एकत्रित लढताना दिसत आहे. तर मागच्या वेळी माजी आ. सुरेश वरपूडकर यांनी नियोजन केल्याने काँग्रेसला यश मिळाले होते. वरपूडकर आता भाजपमध्ये असल्याने काँग्रेसला - स्वबळ सोडून उद्धवसेनेशी हातमिळवणी करावी लागली.

युती, आघाडी, दोन राष्ट्रवादींची आघाडी झाल्याने आता अनेक निष्ठावंतांना उमेदवारीवर पाणी सोडावे लागले आहे. शिवाय मोठा भाऊ म्हणविणारा पक्ष तर उमेदवारही आंदण देऊन यालाच तुमच्या तिकिटावर लढवा - तरच या जागा लागतील, असे सांगत आहे. त्यामुळे हा आणखी वेगळा अन्याय होत आहे. असेही चार ते पाच उमेदवार निष्ठावंतांच्या मानगुटीवर बसल्याचे चित्र दिसत आहे. निष्ठावंतांच्या या नाराजीचा फटका बसू नये म्हणून उमेदवारांच्या याद्याच जाहीर केल्या जात नसून शेवटच्या दिवशीच हे चित्र स्पष्ट होईल, असे दिसते.

आयारामांनीही निष्ठावंतांचेच केले नुकसान

पक्षात आधीच सक्षम उमेदवार असताना राजकीय तडजोडीचा भाग म्हणून बाहेरून एखादा उमेदवार आयात केला जात आहे. त्याला नुसता मान-सन्मानच नव्हे, तर तिकीटही बहाल केले जात आहे. याचाही अनेक निष्ठावंतांना फटका बसला आहे. त्यामुळे निष्ठावंत केवळ सतरंज्या उचलण्यासाठीच उरल्याचे चित्र दिसत आहे.

स्वबळाचा बाणा पडला गळून

भाजपने समविचारी शिंदेसेनेला सोबत घेतले. तर काँग्रेसने हे दोन पक्ष एकत्र झाल्याने अखेर उद्धव सेनेशी जुळवून घेतले. तर या आघाडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाने पुण्याच्या धर्तीवर परभणीतही राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाशी आघाडी केली. त्यामुळे सगळ्यांचाच स्वबळाचा बाणा गळून पडला आहे.

डॉक्टरांनी वाढविला ताप

या निवडणुकीत विविध पक्षांकडून वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी मनपाच्या राजकीय आखाड्यात उतरली आहे. सहसा राजकारणापासून दूर राहणाऱ्या या मंडळीला अथवा त्यांच्या कुटुंबीयांना पुढाऱ्यांनी चांगला चेहरा म्हणून समोर करण्याचा प्रयत्न चालविला. मात्र यापेक्षाही लक्ष्मीपुत्र असल्याने त्यांना प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. त्यामुळे मतदारांचे चांगभले 5 होणार असून ही बाब इतरांनाही खर्चात पाडणारी असल्याने त्यांच्या डोक्याचा ताप वाढणार आहे.

Web Title: Parbhani Municipal corporation Election 2026 Alliance in Parbhani; But lists of candidates in not disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.