छाननीअंती ६०८ उमेदवार रिंगणात; २१ जण बाद! १४ अपक्षही गेले रिंगणाबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:33 IST2026-01-01T13:33:06+5:302026-01-01T13:33:38+5:30

वंचितचे ३, उद्धवसेना, मनसे, बसपा, जनसुराज्यचा प्रत्येकी १ उमेदवार लढण्यापूर्वीच झाला बाद !

Parbhani Municipal Corporation Election 2026 After scrutiny, 608 candidates are safe; 21 are out! 14 independents also out | छाननीअंती ६०८ उमेदवार रिंगणात; २१ जण बाद! १४ अपक्षही गेले रिंगणाबाहेर

छाननीअंती ६०८ उमेदवार रिंगणात; २१ जण बाद! १४ अपक्षही गेले रिंगणाबाहेर

परभणी : मनपाच्या निवडणूक प्रक्रियेत अर्ज छाननीमध्ये बुधवारी २१ उमेदवार बाद ठरले आहेत. आता रिंगणामध्ये १६ प्रभागांत मिळून एकूण ६०८ उमेदवार असून, आता पुढील दोन दिवस अर्ज माघारीचे असल्याने या प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे. १६ प्रभागांतील ६५ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत नामनिर्देशन पत्र सादरीकरणाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत एकूण ९२६ अर्ज आले होते. त्यात बुधवारी छाननी प्रक्रिया झाली. यामध्ये पक्षासह काही अपक्ष उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारांची संख्या ही ६०८ एवढी राहिली आहे. 

काही उमेदवारांचा दुसरा अर्ज नसल्याने निवडणूक प्रक्रियेतून बाजूला व्हावे लागले तर काहींचे पर्यायी अर्ज असल्याने त्यांना लढण्याची संधी मिळाली. यात वंचितचे तीन, उद्धवसेनेचा एक तसेच मनसेच्या एका उमेदवाराचा अर्ज बाद झाला. शिवाय इतर अपक्षांचाही समावेश यात आहे.

प्रभाग पाच ब मध्ये उद्धवसेनेच्या बायनाबाई सवंडकर यांचा अर्ज अपत्याचे प्रमाणपत्रात तिसरे अपत्य तसेच २००१ नंतरचे एक अपत्य याचा उल्लेख नसल्याने त्यांचा अर्ज बाद केला. प्रभाग सहा अ मध्ये मनसेच्या लता बबनराव उटकर यांचा अर्ज बाद झाला. प्रभाग चार मध्ये सचिन पाटील आणि प्रभाग पाच मध्ये रितेश झांबड यांच्या अर्जाबाबत निकाल राखीव ठेवला. प्रभाग तीन, चार, पाच, सहा मध्ये मिळून एकूण ११ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. 

प्रभाग एक ड मधील दोन उमेदवार, प्रभाग सात क मध्ये एक उमेदवार, प्रभाग सात ड मध्ये एक उमेदवार बाद ठरले. एका उमेदवाराच्या दोन नामनिर्देशन पत्रावरील निर्णय प्रलंबित आहे. सदर नामनिर्देशन पत्रावर आक्षेप नोंदविण्यात आला. प्रभाग १६ ड मध्ये वंचितच्या रंजना भागवत यांना सन २००१ नंतर तिसरे अपत्य असल्यामुळे त्यांचा अर्ज बाद केला. याशिवाय पंधरा इ मध्ये अभिषेक वाकोडकर, १५ अ मध्ये अपक्ष लिंबूबाई सोनवणे, प्रभाग १२ ब मध्ये अपक्ष दुर्गा अर्जुन कल्याणकर यांचा अर्ज विविध कारणाने बाद झाला. प्रभाग ८,९,१४ मध्ये मिळून एक अर्ज बाद झाला.

माहिती मिळण्याला दररोज विलंब

निवडणूक प्रक्रियेत काही निवडणूक निर्णय अधिकारी वेळेत माहिती देत असले तरी काही ठिकाणी मात्र माहिती देण्यास टाळाटाळ होत आहे. काही कार्यालयांमध्ये निवडणुकीचे काम सोडून यासाठी जुंपलेली यंत्रणा वैयक्तिक कामे करण्यात मश्गुल असल्याने ही कामे ठप्प पडत आहेत. मात्र यामुळे वेळेत माहिती बाहेर येत नसल्याने यावरून संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. मागील दोन दिवसांपासून प्रशासनाकडे याबाबत ओरड होत असताना कोणीही लक्ष घालत नसल्याने या अजब कारभाराची चर्चाही जोरात होत आहे. शिवाय टेंडर व मलिद्याच्या कामांमध्ये मात्र प्रशासन गुरफटल्याने या कामांकडे कोणाचे लक्ष नसल्याचा आरोपही होत आहे.

माघारीसाठी गळ घालणे सुरू

अर्ज छाननी प्रक्रियेनंतर आता प्रमुख पक्षांच्या उमेदवारांसह काही अपक्षांकडून आपल्या प्रभागांतील प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज माघारी घ्यावा, यासाठी गळ घातली जात आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून विविध प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत. गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत किती जण अर्ज माघारी घेतात, यावर पुढील लढती अवलंबून आहेत.

Web Title : परभणी चुनाव: 608 उम्मीदवार मैदान में, 21 अयोग्य घोषित

Web Summary : परभणी नगर पालिका चुनाव में छानबीन के बाद 21 उम्मीदवार अयोग्य घोषित। 608 शेष। नाम वापस लेने की प्रक्रिया जारी; प्रमुख दल वोट मजबूत करने हेतु प्रतिद्वंद्वियों को मनाने में जुटे। प्रशासन द्वारा जानकारी में देरी।

Web Title : Parbhani Election: 608 Candidates in the Ring, 21 Disqualified

Web Summary : Parbhani municipal elections see 21 candidates disqualified after scrutiny. 608 remain. Withdrawals are next; key parties are persuading rivals to withdraw to consolidate votes. Administration delays information, causing confusion. Focus is on tender processes.