परभणीत ३१ फेऱ्यांमधून लागणार लोकसभेचा निकाल; प्रशासनाकडून नियोजन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 06:02 PM2024-05-06T18:02:40+5:302024-05-06T18:03:20+5:30

कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवारांकडून विजयाची गणिते लावणे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बूथनिहाय आकडेमोड करण्यात येत आहे.

Parbhani Lok Sabha result from 31 rounds; Planning started by the administration | परभणीत ३१ फेऱ्यांमधून लागणार लोकसभेचा निकाल; प्रशासनाकडून नियोजन सुरू

परभणीत ३१ फेऱ्यांमधून लागणार लोकसभेचा निकाल; प्रशासनाकडून नियोजन सुरू

परभणी: आठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी १३ लाख २१ हजार नागरिकांनी मतदान केले. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून नियोजन सुरू असून, जवळपास ३१ फेऱ्यांमधून लोकसभेचा निकाल लागणार आहे. विशेष म्हणजे विधानसभानिहाय एक टेबल व्हीव्हीपॅटच्या स्लिप मोजण्यासाठी ही राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

१६ मार्च २०२४ रोजी निवडणूक आयोगाच्या वतीने जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागू केली होती. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच २६ एप्रिल रोजी लोकसभा मतदारसंघात २२९० केंद्रांवर मतदान पार पडले. २१ लाख २३ हजार मतदारांपैकी १३ लाख २१ हजार नागरिकांनी मतदान केले. त्यानंतर २७ एप्रिलपासून कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवारांकडून विजयाची गणिते लावणे सुरू आहेत. त्यासाठी मोठ्या प्रमाणात बूथनिहाय आकडेमोड करण्यात येत आहे. परंतु, अद्यापही कोण विजयी होणार, याबाबत मात्र स्पष्टपणे कोणीही बोलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तुल्यबळ लढत झाल्याचे दिसून येत आहे.

परभणी जिल्ह्यात मतदान होऊन एक महिन्यानंतर म्हणजेच ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने त्यानुसार नियोजन सुरू करण्यात आले आहे. जवळपास साडेपाचशेच्या आत कर्मचारी या मतमोजणीसाठी लागणार आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक विधानसभानिहाय १४ टेबलची नियोजन करण्यात आले आहे. या टेबलवर एका फेरीमध्ये ८४ ईव्हीएमची मोजणी करण्यात येणार आहे. जवळपास ३१ फेऱ्यांमधून परभणी लोकसभा निवडणुकीचा निकाल समोर येणार आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील नागरिकांना ४ जूनची प्रतीक्षा लागणार आहे.

पोस्टलसाठी राहणार वेगळी रूम
१३ लाख २१ हजार नागरिकांनी ईव्हीएमवर २६ एप्रिल रोजी आपले मत नोंदविले आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात ३४ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. परंतु, यापैकी केवळ एक उमेदवार विजयी होणार आहे. त्यासाठी १४ टेबल वरून ८४ ईव्हीएमची मतमोजणी होणार आहे. त्याचबरोबर विधानसभानिहाय एक टेबल व्हीव्ही पॅटच्या स्लिप मोजण्यासाठी राहणार आहे. तर, पोस्टल मतदानासाठी वेगळी रूम तयार करून त्या ठिकाणी पोस्टलचे मत मोजले जाणार आहेत.

सकाळी आठ वाजेपासून सुरू होणार निकाल
१८ व्या लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात ६२.२६ टक्के एवढे मतदान झाले. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी कमी राहिली असली तरी मतदान मात्र वाढले. त्यामुळे प्रशासनाला १३ लाख २१ हजार मतं मोजताना मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यासाठी ४ जून रोजी सकाळी आठ वाजेपासून पोस्टल मतदानापासून निकाल सुरू होणार आहे.

जाधव, जानकरांकडून विजयाचे दावे
१७ दिवस प्रचारामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीने मोठा जोर लावल्याचे जिल्ह्यात दिसून आले. देशाच्या पंतप्रधानांसह आजी-माजी मुख्यमंत्र्यांनी परभणीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रचार सभा ठेवल्या. या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला असला तरी हा प्रतिसाद मतदानामध्ये रूपांतरित होतो का हे पाहण्यासाठी ४ जूनपर्यंत थांबावे लागणार आहे. परंतु, दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव व महायुतीचे उमेदवार महादेव जानकर या दोघांकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. मात्र, बाजी कोण मारणार हे निकालाच्या दिवशी कळणार आहे.

Web Title: Parbhani Lok Sabha result from 31 rounds; Planning started by the administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.