परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

By ज्ञानेश्वर भाले | Published: April 19, 2024 06:51 PM2024-04-19T18:51:53+5:302024-04-19T18:53:29+5:30

परभणी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला असून, त्याला घेरण्यासाठी भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे.

Mahayuti's strategy is determined from Khandesh, Sambhajinagar for Parbhani Lok Sabha, senior leaders camp | परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

परभणी लोकसभेसाठी खान्देश, संभाजीनगरातून ठरतेय महायुतीची रणनीती, वरिष्ठ नेते तळ ठोकून

परभणी : लोकसभा निवडणुकीचा आखाडा रंगात आला असून, प्रत्येक उमेदवार आपापल्या प्रचारात गुंतला आहे. प्रचारास निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या हातात केवळ सहा दिवसांचा कालावधीत उरला आहे. महायुतीच्या उमेदवारासाठी अधिक जोर लावत असल्याचे जिल्ह्यातील परिस्थिती आहे. यासाठी महायुतीच्या स्थानिक नेत्यांना वरिष्ठ पातळीवरून सातत्याने डोस दिले जात असल्याची स्थिती आहे. यासह खान्देश आणि छत्रपती संभाजीनगरातून महायुतीची रणनीती आखली जात असल्याची स्थिती आहे. निवडणुकीदरम्यान अधिकाधिक मतदान कसे करून घेता येईल, या दृष्टीने भाजपचे वरिष्ठ नेते परभणीत येऊन स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसून येत आहे. 

परभणी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला असून, त्याला घेरण्यासाठी भाजपसह महायुतीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून रणनीती आखली जात आहे. गत ३५ वर्षांच्या इतिहासात अपवाद १३ महिन्यांचा कार्यकाळ वगळता येथून सेनेच्या उमेदवाराने बाजी मारली आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेना, राष्ट्रवादीत फाटाफूट झाल्याने अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. ज्यांच्यासोबत गत अनेक वर्षे युतीत राहिलेल्या उद्धवसेनेविरुद्ध भाजपला या लोकसभा निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध मतदान मागण्याची वेळ आली आहे. यासह उद्धव सेनेच्या उमदेवारासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे. 

सेनेचा गड राखण्यासाठी त्यांच्याकडून सुद्धा रणनीती आखली जात आहे. सेनेचा गड काबीज करण्यासाठी भाजपने रणनीती आखली असून, महायुतीसाठी खान्देश आणि छत्रपती संभाजीनगर येथून रणनीती आखली जात असल्याची स्थिती आहे. जळगावहून मंत्री गिरीश महाजन आणि छत्रपती संभाजीनगरातील केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह इतर पदाधिकारी जिल्ह्यात सातत्याने येत असल्याची स्थिती आहे. तर दुसरीकडे उद्धवसेनेचे शिलेदार महाविकास आघाडीच्या नेत्यांसह आपली मोट बांधत असल्याचे दिसून येत आहे. 

परभणीसाठी संघर्ष 
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या माध्यमातून ठिकठिकाणी उमेदवार दिले आहेत. यात भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांसाठी महायुतीचे पदाधिकारी सामूहिक प्रयत्न करत आहेत. परंतु, परभणीतील परिस्थिती वेगळी असून, वेळेवर राष्ट्रवादीने आपली जागा राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्याने महायुतीत काही ठिकाणी चलबिचल पुढे येत आहे.  त्यामुळे ‘रासप’च्या उमेदवारांसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सेनेचा बालेकिल्ला सर करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. 

कुणाची रणनीती भारी
या निवडणुकीत महायुती आणि मविआमध्ये लढत होत असून शेवटच्या सहा दिवसात कुणाची रणनीती कुणावर भारी पडेल हे ४ जूनला पुढे येईल. लोकसभेच्या या रणसंग्राम १३ उमेदवार विविध पक्षांचे तर २१ जण अपक्ष रिंगणात आहे.  

जागा परभणीची, पण नेते बाहेरील  
लोकसभेच्या अनुषंगाने राजकीय आकडेमोड करत राष्ट्रवादीने परभणीची जागा राष्ट्रीय समाज पक्षासाठी सोडल्याने जिल्ह्या बाहेरील उमेदवार स्वीकारण्याची वेळ महायुतीवर आली. यासह त्यांच्या प्रचारासाठी सुद्धा जिल्ह्यातील महायुतीचे पदाधिकारी कार्यरत असताना छत्रपती संभाजीनगर, जळगावहून जिल्ह्याची रणनीती ठरवण्यात येत असल्याने काही पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपला स्थानिक पातळीवरील महायुतीच्या नेत्यांवर विश्वास नाही का? असा प्रश्न चर्चिला जात आहे.

एकूण मतदार २१,२३,०५६
पुरुष- ११०३८९१
महिला- १०१९१३२

Web Title: Mahayuti's strategy is determined from Khandesh, Sambhajinagar for Parbhani Lok Sabha, senior leaders camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.