मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मतदान केंद्राच्या पायरीवर मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 18:25 IST2024-11-20T18:24:43+5:302024-11-20T18:25:31+5:30
ह्रदयविकाराचा झटका आल्याने ५५ वर्षीय मतदार लिंबाजी पांडुरंग खिस्ते यांचा मृत्यू

मतदान करण्यासाठी आलेल्या वृद्धाचा मतदान केंद्राच्या पायरीवर मृत्यू; जिंतूर तालुक्यातील घटना
परभणी: मतदान करण्यासाठी केंद्रात जात असताना पायरीवरच हृदयविकाराचा झटका आल्याने एका ५५ वर्षीय मतदाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी जिंतूर तालुक्यातील निवळी बुद्रुक येथे घडली.
विधानसभा निवडणुकीसाठी जिंतूर तालुक्यातील ४३८ मतदान केंद्रांवर बुधवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान सुरू आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत या विधानसभेसाठी ४९ टक्के मतदान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील निवळी बुद्रुक येथील केंद्रावर सकाळी ७ वाजता लिंबाजी पांडुरंग खिस्ते (५५) या ज्येष्ठ मतदाराचे मतदान पहिल्यांदा होणार होते. लिंबाजी खिस्ते हे मतदानाला जात असताना केंद्राच्या पायरीवर आले असता त्यांना ह्रदयविकाराचा अचानक झटका आला. त्यानंतर तेथील उपस्थितांनी प्रशासनाच्या मदतीने त्यांना बोरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर लिंबाजी खिस्ते यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
९ तासात ४८.८४ टक्के मतदान
विधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेदरम्यान सरासरी ४८.८४ टक्के मतदान झाले आहे. तर गंगाखेड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५१.७५ टक्के मतदान आतापर्यंत झाले आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात बुधवारी सकाळपासूनच मतदारांनी केंद्रांवर मतदानासाठी रांगा लावल्या आहेत. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
असे झाले दुपारी तीन वाजेपर्यंत विधानसभानिहाय मतदान
जिंतूर विधानसभा.....४९.२
परभणी विधानसभा..... ४४.९९
गंगाखेड विधानसभा.... ५१.७५
पाथरी विधानसभा..... ४८.०८