ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 06:18 IST2026-01-21T06:17:18+5:302026-01-21T06:18:10+5:30
शिंदेसेनेने दोन उमेदवार फाेडल्याने मनसेला फटका

ठाकरे बंधूंसोबत ‘दगाफटका’ करणाऱ्यांना इशारा; घणसोली परिसरात झळकले बॅनर
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत फोडाफोडीचे राजकारण शिजत असतानाच शिंदेसेनेने उद्धवसेनेचे दोन उमेदवारच फोडले होते. त्याचा फटका ‘मनसे’ला बसला असून, अपेक्षित जागा गमवावी लागल्याची खंत व्यक्त होत आहे. त्यातूनच युतीची उमेदवारी घेऊन शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेऊन दगाफटका करणाऱ्यांना इशारा देणारे बॅनर घणसोलीत झळकत आहेत.
नुकत्याच झालेल्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धवसेना व मनसेच्या युतीने घणसोली प्रभाग ९ मधून मनसेला १ तर उद्धवसेनेला ३ जागा दिल्या होत्या. मनसेच्या स्थापनेपासून या विभागात सक्रिय असलेले शहर संघटक संदीप गलुगडे यांच्या पत्नी मंदा गलुगडे, उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आत्माराम सणस यांच्या पत्नी गीता सणस, मंगेश साळवी व ऐनवेळी उद्धवसेनेत आलेल्या सचिन शिरसाठ यांना उमेदवारी दिली होती. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या अंतिम क्षणी सणस व शिरसाठ हे अर्ज मागे घेऊन भूमिगत झाले होते. त्यामुळे पॅनलमध्ये युतीच्या गलुगडे व साळवी यांच्यापुढे पेचप्रसंग निर्माण झाला होता.
शिंदेसेनेने अगोदरच रचलेल्या डावात युतीचा टिकाव लागला नाही. त्यातूनच ठाकरे बंधूंसोबत गद्दारी करणाऱ्यांना माफी नसल्याच्या इशारा देणारे बॅनर घणसोलीत झळकले आहेत.
असा विरोधकांचा डाव
यापूर्वी निवडणूक लढलेल्या शृंखला गावडे यांनी उद्धवसेनेकडे उमेदवारीसाठी दावा केला होता. मात्र, सणस यांना उमेदवारी दिली गेली; परंतु भाजपमधून ऐनवेळी शिंदेसेनेत गेलेल्या सुनील मस्कर यांनी सणस यांना अगोदरच गळाला लावले होते. तर सचिन शिरसाठ यांनी उद्धवसेनेतून अर्ज भरून ऐनवेळी माघार घेणे हाही विरोधकांचा राजकीय डाव होता, हे युतीच्या उशिरा लक्षात आले.