"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 16:21 IST2026-01-15T16:20:50+5:302026-01-15T16:21:25+5:30
नवी मुंबईचे पोलीस कुणाच्या ताटातले मांजर आहे का? अशाप्रकारे जे काही चाललंय ते चुकीचे आहे अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे.

"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
नवी मुंबई - महापालिका निवडणुका सुरू आहेत. उमेदवारांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक बुथला भेटी देत आहे. परंतु पोलिसांना हाताशी धरून बाहेरून माणसं आणून याठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न होतोय. मतदारांना धमकावण्याचा प्रयत्न होतोय. खोट्या केसेस टाकण्याचा प्रयत्न होतोय. पोलीस आयुक्तांनी कुणाच्या तरी हातातलं बाहुलं बनू नये. महापालिका वेगळ्या लढत असलो तरी सत्तेत आम्हीही सहभागी आहोत असं सांगत शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
खासदार नरेश म्हस्के म्हणाले की, दादागिरी करून मतदारांचे आयडी चेक करणे, मतदारांना मारणे असे प्रकार नवी मुंबईत सुरू आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी कुणाच्या घरी हातातलं बाहुलं बनू नये हे आमचं आवाहन आहे. आमच्या २ उमेदवारांना ताब्यात घेतले. काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ते उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत होते. उमेदवारांना काम करू देत नव्हते. पोलिसांनाही याबाबत कळवले. मात्र शेवटी अती झाले त्यामुळे उमेदवार जाब विचारण्यासाठी आमचे उमेदवार गेले होते. मात्र त्यांना पोलिसांनी अटक केले. पोलिसांचा वापर करून उमेदवारांना मतदारांपर्यंत जाण्यापासून वंचित ठेवणे हा सर्रास चुकीचा प्रकार आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच रस्त्याने चालणाऱ्या माणसाला मारणे, व्होटिंगला जाऊ नको म्हणून दादागिरी करणे, ही हुकुमशाही आहे का..? नवी मुंबईचे पोलीस कुणाच्या ताटातले मांजर आहे का? अशाप्रकारे जे काही चाललंय ते चुकीचे आहे अन्यथा आम्हाला सुद्धा कायदा हातात घ्यावा लागेल. कुणाच्या तरी दमदाटीमुळे पोलिसांचा नाईलाज झालेला आहे. काही जण स्वत:ला नवी मुंबईचे सम्राट समजतात ते मंत्री निवडणूक आयोगावरही टीका करतायेत. सरकारी यंत्रणेला दावणीला बांधण्याचा प्रकार आहे असंही खासदार नरेश म्हस्के यांनी म्हटलं.
दरम्यान, या प्रकारात गृह मंत्रालयाचा काही हात नाही. कुणी तरी स्वत:ला नवी मुंबईचे सम्राट म्हणवतात त्यांच्याकडून जोरजबरदस्तीने असे प्रकार सुरू आहेत असं सांगत नरेश म्हस्के यांनी गृह मंत्रालय सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बाजू सावरून घेतली.