भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 21:32 IST2026-01-09T19:32:13+5:302026-01-09T21:32:53+5:30
आम्ही हरामाचा पैसा कमावला नाही. त्यांनी सांगावे चौकशी करा, मग होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी असं सांगत गणेश नाईकांनी शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला.

भाजपा नेते गणेश नाईकांचा नगरविकास खात्यावर गंभीर आरोप; "२२०० कोटी कुठे गेले, ईडीनं चौकशी करावी"
नवी मुंबई - मुंबई, ठाणे येथे भाजपा शिंदेसेना महायुतीत लढत असले तरी अनेक महापालिकांमध्ये हे दोन्ही पक्ष समोरासमोर निवडणुकीला उभे आहेत. त्यात नवी मुंबई महापालिकेत भाजपा मंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष आणखी वाढला आहे. नवी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरून नाईकांनी थेट नगरविकास खात्यावर गंभीर आरोप केले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या एफडी ३ हजार कोटींवरून ८०० कोटींवर कशा आल्या, याची चौकशी ईडीने केली पाहिजे असं सांगत नाईकांनी ठाणे जिल्ह्यात गुंडगिरी सुरू आहे असा आरोप केला.
गणेश नाईक म्हणाले की, ठाणे जिल्ह्यात गुंडगिरी सुरू आहे. अनेक पक्षांविरोधात गुंडागर्दी सुरू आहे. ही पापे फेडावी लागतील. जनता कुणाला माफ करत नाही. माझं ईडीला आव्हान आहे. नवी मुंबई महापालिकेचे विशेष ऑडिट करावे. ३ हजार कोटींची एफडी होती ती आता ८०० कोटींवर आली. आम्ही थांबवले नसते तर तीपण शून्य झाली असती. नगरविकास खाते कुणाकडे आहे. प्रशासक कुणाच्या नियंत्रणात काम करतात. भविष्यात या सगळ्या वस्त्या राहण्या लायक राहणार नाहीत. बजबजपुरी होईल. २०१९ नंतर कुणी हे सगळे केले ते शोधावे लागेल असं त्यांनी सांगितले.
तसेच ज्याप्रकारे एफएसआय वाढवण्यात आलेत ते पाहता या नवी मुंबईत शहरात गाड्या, सायकल काय चालतही जायला लोकांना धक्के द्यायला लागतील. शहराच्या विकासासाठी आराखड्यात जे भूखंड होते ते सिडकोने विकायला टाकले. कुणाच्या सहमतीने हे विकले, याची लाज वाटली पाहिजे. शहरातील जनतेचा हा पैसा आहे. चौकशी झालीच पाहिजे. एसआयटी नेमा. फक्त ५ वर्षाकरता नाही जेव्हापासून महापालिका स्थापन झाली आणि तेव्हापासून स्थायी समितीत मंजूर झालेले ठराव तपासा. गणेश नाईकांचे हात साफ आहेत. आम्ही हरामाचा पैसा कमावला नाही. त्यांनी सांगावे चौकशी करा, मग होऊन जाऊ द्या दूध का दूध आणि पानी का पानी असं सांगत गणेश नाईकांनी शिंदेंवर नाव न घेता हल्लाबोल केला.
दरम्यान, गणेश नाईकांनी केलेल्या आरोपावर शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पलटवार केला. चुकीच्या पद्धतीने आरोप करणे हे त्यांचे काम आहे. गेले कित्येक वर्ष नवी मुंबईचा खऱ्या अर्थाने जो विकास करायला हवा होता तो यांनी केला नाही. आरोप कुणी करावेत, काही व्हाईट हाऊस, ब्लॅक हाऊस आणि कुठल्या कुठल्या जागा, कंपन्या यावर जास्त बोलायची गरज नाही. या लोकांच्या चांडाळ चौकडीने जी कामे केलीत ती सगळ्यांना माहिती आहे. केवळ शिंदेवर असलेली आसूया आणि पोटदुखी यातून ते आरोप करतायेत असा टोला म्हस्केंनी गणेश नाईकांना लगावला.