NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:13 IST2025-12-30T14:11:04+5:302025-12-30T14:13:23+5:30
Navi Mumbai Mahanagar Palika Election 2026: माझ्या कार्यकर्त्यांना घरी बसवतायेत तसे तुमची मुलेही घरी बसतील. ज्यांना तिकीट दिले त्यांनी कधी पक्षाचे कमळ तरी हातात घेतले होते का? असा सवाल मंदा म्हात्रेंनी केला आहे.

NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
नवी मुंबई - माझ्यावर अन्याय करा, पण कार्यकर्त्यांना डावलू नका. ज्यांनी भाजपाचं काम केले त्यांना तिकीट देत नाही. माझ्या मतांवर डोळा ठेवून ज्यांनी तुतारीला मतदान केले त्यांना उमेदवारी दिली जातेय. हा कुठला मर्दपणा? तुमच्यात हिंमत असेल १११ नगरसेवक निवडून आणा. आम्ही भाजपासोबत आहोत. यांच्यासारखे गद्दार नाही. तिकीट न मिळाल्यास तुतारीवर लढायचे. दुबई, पाकिस्तानवरून धमक्यांचे फोन आणायचे. हे धंदे आम्ही केले नाहीत अशी संतप्त भावना भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी मांडत मंत्री गणेश नाईकांवर हल्लाबोल केला आहे. नवी मुंबईत उमेदवारीवरून भाजपातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
भाजपा आमदार मंदा म्हात्रे म्हणाल्या की, नाईकांना कुटुंबाशिवाय काही दिसत नाही. घरात ५-५ उमेदवारी देतात. मी गणेश नाईकांना दोनदा पाडलं आहे. माझ्या कार्यकर्त्यांना घरी बसवतायेत तसे तुमची मुलेही घरी बसतील. ज्यांना तिकीट दिले त्यांनी कधी पक्षाचे कमळ तरी हातात घेतले होते का? भाजपा कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम केले जातेय. राष्ट्रवादीला जसे गंडवले तरी भाजपाला गंडवण्याचं काम गणेश नाईक करत होते. तुम्ही खरे नेते असाल तर १११ नगरसेवक निवडून आणा असं चॅलेंजही म्हात्रे यांनी गणेश नाईकांना दिले आहे.
तसेच जर नाईकांनी १११ नगरसेवक निवडून आणले तर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देईन. नाईकांचा डोळा बेलापूरवर आहे. त्यांना अजून जाग आली नाही. मी पक्षासोबत आहे. ज्या लोकांना गणेश नाईकांनी घेतले त्यांना तिकीट दिले. इथल्या लोकांचे प्रश्न गणेश नाईक सोडवते का मंदा म्हात्रे हे सगळ्यांना माहिती आहे. मला १३ एबी फॉर्म दिले. ते भरायला सांगितले परंतु त्यावर जिल्हाध्यक्षांनी सही केली नाही. आज सकाळपासून ते गायब आहेत. आता त्यांना किडनॅप केलंय का ते स्वत: गायब आहेत किंवा त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे हे मला माहिती नाही असा आरोपही म्हात्रे यांनी केला.
दरम्यान, मी माझ्या १३ कार्यकर्त्यांना बोलावून फॉर्म भरून घेतले आणि आता ते फक्त ४ जणांना उमेदवारी देऊ असं म्हणतायेत. त्या ४ जागा शिंदेसेनेकडे आहेत. तिथे आमचे उमेदवार पडू शकतात. मग बेलापूरमध्ये उमेदवार पडले तर त्याचे खापर मंदा म्हात्रेवर फोडले जाईल. मी संघर्षातून निर्माण झालेली ठिणगी आहे. मी कार्यकर्त्यांसाठी नेहमी भांडत आलीय. आज कुणालाच एबी फॉर्मवर सही केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी संजीव नाईकांना फोन करून सांगितले होते, मंदाताईच्या १०-१२ जणांना चर्चा करून उमेदवारी द्या. मात्र संजीव नाईकांनी भेटणेही टाळले असंही आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलं.