"तुम्ही माझं घर आणि कुटुंब…’’, राहुल गांधींचं वायनाडच्या जनतेला भावूक पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2024 20:44 IST2024-06-23T20:44:33+5:302024-06-23T20:44:49+5:30
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली ...

"तुम्ही माझं घर आणि कुटुंब…’’, राहुल गांधींचं वायनाडच्या जनतेला भावूक पत्र
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. तसेच या दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. दरम्यान, नियमानुसार एका मतदारसंघातून राजीनामा देणं आवश्यक असल्याने राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिला आहे. आता राहुल गांधी यांनी वायनाडमधील जनतेला एक भावूक पत्र लिहिलं आहे. तसेच तुम्ही माझ्यासाठी घर आणि कुटुंब आहात, असे उदगार राहुल गांधी या पत्रातून काझले आहेत.
राहुल गांधी या पत्रात लिहिता की, वायनाडमधील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, तुम्ही माझ्यासाठी जे काही केलंय, त्यासाठी मी तुमचे कसे आभार मानू हे मला कळत नाही आहे. मला सर्वाधिक गरज असताना तुम्ही मला प्रेम आणि संरक्षण दिलं. तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात. मी तुमच्यासाठी नेहमी उपस्थित राहीन. तुमचे खूप खूप आभार.
राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये वायनाडमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. तसेच या मतदारसंघाचं पाच वर्षे प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर २०२४ मध्येही राहुल गांधी यांनी वायनाडसोबतच रायबरेलीतून निवडणूक लढवली. तसेच दोन्ही मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. दरम्यान, आता राहुल गांधी यांनी वायनाडमधील खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या भगिनी प्रियंका गांधी ह्या येथून पोटनिवडणूक लढवणार आहेत.