मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 20:15 IST2019-04-12T20:14:22+5:302019-04-12T20:15:01+5:30
आपल्या वक्तव्यांमधून नेहमी वाद ओढवून घेणारे साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे.

मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन; भाजपाच्या साक्षी महाराजांची धमकी
उन्नाव (उत्तर प्रदेश) - आपल्या वक्तव्यांमधून नेहमी वाद ओढवून घेणारे साक्षी महाराज यांना भाजपाने पुन्हा एकदा उन्नाव लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. सध्या साक्षी महाराज प्रचारात गुंतले असून, प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मला मतदान करा अन्यथा मी माझी सर्व पापं तुमच्या पदरात टाकेन, तुम्हाला शाप देईन, अशी भीती साक्षी महाराज यांनी मतदारांना दाखवली.
प्रचारादरम्यान मतदारांना संबोधित करताना साक्षी महाराज म्हणाले की, ''मी संन्यासी आहे. तुमच्या दरवाजावर भीक मागण्यासाठी आलो आहे. आता तुम्ही एका संन्याशाला नाकारले तर तुमचेच नुकसान होईल. हे मी नाही तर शास्र सांगत आहेत. तुमच्याकडे कुणी काही मागत असेल आणि तुम्ही त्याची इच्छा पूर्ण केली नाही तर तुम्ही पापाचे भागीदार होऊ शकता. एवढेच नाही तुम्ही मला मतदान न केल्यास मी तुमच्या जीवनातील सर्व पुण्य घेऊन पाप तुम्हाला देऊन जाईन,''
दरम्यान, साक्षी महाराज यांनी वादग्रस्त वक्तव्य करण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीसुद्धा साक्षी महाराज यांनी राम मंदिर, प्रियंका गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त विधाने केली होती. मात्र आता चक्क निवडणुकीचा ज्वर चढला असताना साक्षी महाराजांनी चक्क मतदारांनाच शाप देऊन त्यांच्या पदरात पाप टाकण्याची धमकी दिल्याने वाद होण्याची शक्यता आहे.